top of page

आता दांडकं नाही, तर कोयता काढू- लक्ष्मण हाके

मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेला जीआर रद्द करून 58 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी. आज लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला.


मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर हा ओबीसींचे आरक्षण संपवणारा आहे, यापुढे आम्ही दांडकं नाही तर कोयते काढू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. बंजारा समाजानेही आता वेगळं आरक्षण न मागता ओबीसींची एकजूट राखावी, कुणीही ओबीसींमध्ये फूट पडेल असं कृत्य करू नये असं अवाहन हाकेंनी केलं. हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे.


मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणारा आहे. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे ते जीआर मागे घेतली असं लक्ष्मण हाके म्हणाले. ओबीसी आरक्षणासाठी हा विद्रोह आहे. आमच्या हक्काचं ओबीसींचे आरणि संपवण्याचा घाट घातला जातोय. आता हातामध्ये दांडकं नाही तर कोयते घेऊ असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.


दरम्यान हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू केल्यानंतर बंजारा समाजानेही त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “ बंजारा समाजाला विनंती आहे, आपलं ताटातलं आरक्षण वाचवणं आवश्यक आहे. डोंगराच्या पल्याड हवेली आहे असं सांगितलं जातंय, ती हवेली आपल्याला कधी मिळेल ते मिळेल . पण आता आपलं झोपडं वाचवू. आता आपल्यामध्ये फूट पडेल असं कोणत्याही समाजाने वागू नये. एसटी आरक्षण कधी मिळेल यांची माहिती नाही, पण तोपर्यंत आपल्या हक्काचं आरक्षण संपलेलं असेल. आता एकट्याने काही मागायची वेळ नाही. सगळ्यांनी मिफन अपलं आरक्षण वाचवलं पाहिजे”.

बंजारा समाज आक्रमक

हैदराबाद गॅझेटनुसार, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात हजारोंच्या संख्येने बजारा स्त्री-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटीतून आरक्षणाची मागणी करताना त्यांनी खास पारंपारिक वेशभुषा केली होती. जय सेवालाल, एसटी आरक्षण मिळालच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभेतून आदिवासी आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर मुंबईत मोर्चा नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अकोल्यातही बंजारा समाजानं एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी आंदोलन केलं. बंजारा समाज आरक्षण कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलनातही पारंपारिक वेषातील बंजारा समाजा मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता.

Comments


bottom of page