आभाळ फाटलं!: मुंबईसह कोकणाला झोडपलं, राज्यात पावसाचा हाहाकार मुंबई, उपनगरात अतिमुसळधार, सखल भाग पाण्याखाली, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

मुंबई: महाराष्ट्रात मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून गेल्या 24 तासांत मुंबईसह उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पावसाने अक्षरश: हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरांतील रस्ते वाहतूक आणि लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला असून सखल भागात 2 ते 3 फूटापर्यंत पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी शाळा आणि इमारतींमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून दादर, माटुंगा,सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलूंड परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अंधेरी सबवेमध्ये सुमारे अडीच फुटापर्यंत पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला. वीरा देसाई आणि संतोषनगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर 2 ते 3 फूटांपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी कोंडी झाली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरीजवळ एसआरपीएफ कॅम्प समोर 2 ते 3 फूट पाणी साचल्याने महामार्गावरील वेग मंदावला. वरळी आणि चेंबूरमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.
संध्याकाळच्या सुमारास लाखो चाकरमानी घरी जाण्यासाठी निघाले असतानाच पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर, मुलुंड ते ठाणे दरम्यान पावसाचा जोर कमालीचा वाढला. दुपारी पाण्याचा निचरा झाला असला तरी संध्याकाळी पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
वसईतील वाघराळ पाड्यात मुसळधार पावासामुळे पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की, 3 दुचाकी आणि 2 कार वाहून गेल्या. सुदैवाने एका कार चालकाने प्रसंगावधान राखून कारमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. नालासोपार्यातील सेंट्रल पार्क आणि तुळींज परिसरात पाणी साचल्याने अंतर्गत वाहतूक विस्कळीत झाली. कल्याणमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी जगत मंडळ शाळेत पाणी शिरले. ज्यामुळे खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना तातडीने घरी सोडण्यात आले.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 8 तासांत तब्बल 82.76 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुख्य बाजारपेठ, वंदन डेपो, मासुंदा तलाव आणि कोपरी बारा बंगाल परिसरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. दुपारी 2.25 च्या सुमारास समुद्रात आलेल्या मोठ्या भरतीमुळं मुंब्रा भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे मुंब्रा-शीळ मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून अनेक वाहने पाण्यात अडकली आहेत.
नवीमुंबईतील सानपाडा परिसरात रस्त्यांना अक्षरश: नदीचे स्वरुप आले. अनेक वाहने पराण्यात बुडाली आहेत. सायन- पनवेल हायवेवर पाणी साचल्याने मैलोन्मैल वाहनांच्या रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. माणगावजवळील मुगवली फाटा आणि ढालघर फाटा परिसरात मुंबई- गोवा महामार्गावर पाणी आल्याने चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
मुंबई आणि पुण्यात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. काल चेंबूरमध्ये एका शाळकरी मुलाचा झाड अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज मुंबईतील मरोल मिलिटरी रोड आणि जोगेश्वरीतील यादव नगर येथील पॅरामाऊंट इमरातीजवळ मोठे झाड उन्मळून पडले, ज्यामुळे अनेक चारकचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. पुण्यातही बाजीराव रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवावी लागली. सुदैवाने आज कुठेही जीवितहानी झाली नाही. पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व छाटणी केली नसल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, उद्याही पालघर जिल्ह्यासाठी हवामन खात्याने रेड अलर्ट काय ठेवल्याने जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यवालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
मराठवाडा, विदर्भाला ‘ ऑरेंज अलर्ट ’ : हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.



Comments