top of page

युरोपमधील “अंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो”मध्ये सिद्धेश कदम यांनी केले राज्याचे प्रतिनिधीत्व

युरोपमधील ॲमस्टरडॅम येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो” मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण  मंडळाचे अध्यक्ष  श्री. सिध्देश  कदम यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर  प्लास्टिक  रिसायकलींग आणि सक्युर्लर इकोनॉमी या चर्चा सत्रात सिध्देश कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्लास्टिक  रिसायकलींगमध्ये कोणती महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे याबाबत सविस्तर भाष्य केले आहे.


नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम येथे “ग्लोबल पॉलिमर ग्रुप” आणि “प्लास्टिक रिसायकलर्स युरोप” यांच्यावतीने  आयोजित  करण्यात  आलेल्या 'प्लास्टिक रिसायकलिंग शो (PRS) युरोप २०२६' या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी कदम उपस्थित राहिले होते. या परिषदेमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून प्लास्टिक रिसायकल करणारे ५११ संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी महाराष्ट्राच्या  प्लास्टिक रिसायकलिंग उदयोगांना व राज्यातील सर्क्यूलर इकॉनॉमीला चालना देण्याकरिता या परिषदेतील प्रगत तंत्रज्ञान  पुरवणाऱ्या  संस्थांच्या प्रतिनिधींशी कदम यांनी संवाद साधला. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित करण्यात  आलेल्या चर्चा  सत्रात राज्याच्या वतीने श्री. सिध्देश कदम यांनी आपली भूमिका मांडली.


यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात 'जागतिक प्लास्टिक व्यापारासाठी ट्रेसिबिलिटीचे महत्त्व' या विषयावरील कदम यांनी महाराष्ट्राची ठाम भूमिका मांडली.


'ट्रेसिबिलिटी' हा घटक तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रभावी ठरेल, जेव्हा युरोप, आशिया आणि अमेरिका यांच्यात माहितीची पारदर्शक  देवाणघेवाण होईल. प्लास्टिक आणि 'PET' प्लास्टिकचा प्रश्न हा केवळ भारतापुरता मर्यादित नसून तो एक जागतिक प्रश्न आहे. भारताने या दिशेने पाऊल उचलत जुलै २०२५ पासून प्रत्येक उत्पादनासाठी QR कोड प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीमुळे आता भारतातील सामान्य माणूस प्लास्टिक कुठून आले आणि त्याचे पुढे काय होणार, याची माहिती सहज मिळवू शकतो, अशी भूमिका ही जागतिक मंचावर अभिमानाने सांगितले. यासोबतच, भारताच्या अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये रिसायकल  प्लास्टिकचे  प्रमाण ३०% वरून ४०% पर्यंत नेण्याच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाची माहिती दिली. तसेच, GST प्रणालीच्या माध्यमातून  आपण प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन कसे सुनिश्चित करतोय, यावर सविस्तर  भाष्य केले.


महाराष्ट्र प्लास्टिक प्रदूषणाच्या आव्हानाकडे केवळ स्थानिक समस्या म्हणून न पाहता, एक जागतिक जबाबदारी  म्हणून पाहत आहे. तंत्रज्ञानाची जोड आणि पारदर्शकतेच्या जोरावर आपण प्लास्टिकची ट्रेसिबिलिटी घेत आहोत. आमचे उद्दिष्ट केवळ प्रदूषण रोखणे नाही, तर 'सर्क्युलर इकॉनॉमी'च्या माध्यमातून उद्योगांना नवी दिशा देणे हे आहे अशी भूमिका कदम यांनी विषद केली.


या चर्चासत्रामध्ये ‘प्लास्टिक रिसायकलर्स युरोप’चे डेव्हिड एस्लावा, 'इंडोरमा व्हेंचर्स’चे हर्मिस पानागिओटोपौलोस, 'FEAD' चे राफेल बासिआनो, 'INEOS' च्या यवोन व्हॅन वीन आणि 'Argus Media' चे विल कॉलिन्स यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला.


या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला कदम यांनी भेट देऊन  पुढील भविष्यात मुंबई येथे नवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण  करण्यासाठी  विशेष उपक्रमाचे  आयोजन करणार  असल्याचे  प्रतिपादन केले आहे.

Comments


bottom of page