top of page

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, जमिनीला भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

नाशिक: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज सायंकाळी 7:23 वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले. अचानक जमिनीला भल्या मोठ्या भेगा पडल्या. तर घराच्या भिंती थरथरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.


गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात वारंवार असे सौम्य धक्के बसत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भूकंपाने जमिनी हादरल्या, शेती जमिनींना भेगा पडल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि परिसरात सायंकाळच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवले. धक्के जाणवताच नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडून उघड्या जागेवर जमा झाले.


या धक्क्यांची तीव्रता जरी सौम्य असली तरी गेल्या दोन दिवसांत लागोपाठ या घटना होत असल्यानं स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या सततच्या धक्क्यांमुळे परिसरातील काही शेतजमिनींना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये अधिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठी वित्तहानी झालेली नाही शिवाय घरांचे किंवा इतर पायाभूत सुविधांचे कसल्याही नुकसानीची नोंद नाही.


सुरगाणा तालुक्यातील या परिस्थितीवर स्थानिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. हा भूकंपाचा सौम्य धक्का असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments


bottom of page