top of page

कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म ची सुरुवात

कोकणातील पर्यटनाला अधिक व्यापक ओळख मिळावी, स्थानिक होमस्टे चालकांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील लघु उद्योजकांना व्यवसायवाढीच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने KokanHomestays.in या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यात आली आहे.

कोकणातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, जैवविविधता, मालवणी खाद्यसंस्कृती आणि निसर्गसौंदर्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, अनेक छोट्या होमस्टे चालकांकडे स्वतःची वेबसाइट किंवा डिजिटल माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा नसल्याने त्यांना अपेक्षित व्यवसाय मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


सध्या या प्लॅटफॉर्मवर ८७५ हून अधिक होमस्टे, १८१ हून अधिक गावे आणि ८ प्रमुख पर्यटनस्थळांतील निवासाची माहिती उपलब्ध असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील होमस्टे मालकांना त्यांच्या व्यवसायाची माहिती, सुविधा, संपर्क तपशील आणि बुकिंगसाठी आवश्यक माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ होमस्टेची माहिती उपलब्ध करून देणे नसून कोकण पर्यटनाला चालना देणे, छोट्या होमस्टे व्यवसायांना डिजिटल ओळख मिळवून देणे आणि स्थानिक व्यवसायांना अधिक पर्यटकांशी जोडणे हा आहे. यामुळे स्थानिक युवक, महिला बचत गट, शेतकरी, मत्स्यव्यवसायाशी संबंधित कुटुंबे, हस्तकला आणि स्थानिक खाद्य व्यवसायांनाही अप्रत्यक्षपणे लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पर्यटकांना हॉटेलऐवजी स्थानिक कुटुंबांसोबत राहण्याचा अनुभव, कोकणातील अस्सल संस्कृती, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि ग्रामीण जीवन जवळून अनुभवण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तसेच कमी परिचित पर्यटनस्थळांनाही डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्याने पर्यटनाचा लाभ अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


होमस्टे नोंदणी प्रक्रिया सुलभ ठेवण्यात आली असून अधिकाधिक होमस्टे चालकांनी या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


महत्त्वाची आकडेवारी

८७५+ होमस्टे
१८१+ गावे
८ प्रमुख पर्यटनस्थळे

bottom of page