top of page

video/ व्हिडिओ पोस्ट करत नांदेडमध्ये शेतकर्‍यांने जीवन संपवलं; यंदाचा दुष्काळ अन् व्यवस्थेच्या धोरणांचा नांदेडमध्ये पहिला बळी

6 hours ago
2 min read

नांदेड : यंदा राज्यात दुष्काळाचं किती भीषण सावट आहे याची अधिक गांभीर्यानं कल्पना येईल अशी घटना नांदेडमध्ये घडली आहे. पावसाच्या दिर्घ खंडामुळं दुष्काळी परिस्थितीत हाता तोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावला. दुष्काळात शेतकर्‍यांसमोर समस्यांचा डोंगर उभा आहे, त्यातच नांदेड जिल्ह्यतील एका शेतकर्‍यांने व्हिडीओ लाईव्ह करत जीवन संपवले आहे. आधिच डोक्यावर कर्जाचं ओझं, मलांच्या शिक्षणासाठी फी ची चिंता आणि सरकारच्या कर्जमाफीच्या यादीत नांव न आल्याने या शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. व्हिडिओ लाईव्ह करत मृत्यूला कवटळल्याने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुष्काळी समस्यां आणि व्यवस्थेच्या कुचकामी धोरणाचा नांदेडमध्ये यंदाच्या दुष्काळातील शेतकर्‍याचा पहिला बळी ठरला आहे.


नांदेड जिल्ह्यातील बोरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर क्षीरसागर यांनी आपल्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी आपल्या या परिस्थितीचं कारण आणि सरकारचा अनागोंदी कारभार यावर भष्य केलं आहे.


व्हिडिओमध्ये क्षीरसागर म्हणतात “ हॅलो कलेक्टर साहेब मी विनंती करतो की, शासनानं जाहीर केलेल्या माझ्या तीन कर्जमाफी झाल्या तरीही माझं कर्ज माफी झालेल्या शेतकर्‍यांच्या यदीत कधीच नांव आलेलं नाही, यानिमित्त मी आत्महत्या करतो आहे. मुलींसाठी शैक्षणिक फी माफ असल्याचं शासन म्हणतं पण ती कुठे माफ आहे सांगा बरं? मी तुमच्यासारखाच आहे. माझी कलेक्टर साहेबांनी गांभीर्यानं चौकशी करावी” अशा शब्दांत या शेतकर्‍यानं आपली परिस्थिती शासन दरबारी मांडली आणि आपलं जीवन संपवलं.


दरम्यान, हा शेतकरी अल्पभूधारक होता, पावसानं दडी मारल्यानं त्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेलं पिक करपून गेलं. त्यामुळं आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना शेती उत्पादनातून कर्जाची पूर्तता आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील अशी त्यांना आशा होती. पण तत्पूर्वीच दुष्काळामुळं सगळं होत्याचं नव्हतं झालं. त्यातच मुलीच्या शिक्षणासाठीची फी पण भरायची होती. शासनानं मुलींसाठी फी माफी आणि शेतर्‍यांसाठी कर्जमाफी केलेली असली तरी या दोन्ही लाभांपासून हे शेतकरी वंचित राहिले, त्यांना शासनाकडून कुठलीही मदत मिळू शकली नाही, अशी माहिती आहे.


त्यामुळे यंदाच्या दुष्काळाचं भीषण रुप आता समोर यायला लागलं आहे. पुढार्‍याच्या काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही अधिक भीषण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे याबाबत राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून कशा प्रकारे राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त व्यक्तीला मदत दिली जाते याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments


bottom of page