top of page

कोल्हापूर जिल्ह्यातील वनपर्यटन प्रकल्प मोडकळीस! देखभालीअभावी कोट्यावधींची सामग्री धुळ खात पडून, पुनरुज्जीवनर, सक्षम व्यवस्थापनाची गरज


कोल्हापूर: जिल्ह्यातील वनंसवर्धनासोबत जनजागृती आणि पर्यटनपूरक सुविधा उभारण्याच्या उद्देशाने वनविभागाने काही महत्वकांक्षी प्रकल्प राबविले. मात्र, देखभाल आणि व्यवस्थापनाअभावी सहा ठिकाणांच्या प्रकल्प सुविधा मोडकळीस आल्या आहेत. सुमारे पाच कोटीचीं साधनसामग्री धूळ खात पडून आहे.


या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करून सक्षम व्यवस्थापन केल्यास पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळू शकतील आणि वनविभागालाही महसुलाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मात्र, याबाबत संबंधित अधिकार्‍यांची भूमिका काय असेल? याकडे लक्ष लागले आहे.

पश्चिम घाटातील निसर्गसंपदा अनुभवण्यासाठी विविध राज्यांतील पर्यटक कोल्हापूर मार्गे गोवा-कोकणाकडे जातात. यातील अनेक जण जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिकस्थळांना भेट देतात आणि काही जण जंगल पर्यटनाचाही आनंद घेतात.


जंगलाबाबत जागृती व्हावी, यासाठी ठराविक भागात नियम व अटींच्या आधीन राहून पर्यटनास मान्यता दिली होती. जिल्ह्यातील रामलिंग (ता.हातकणंगले) येथे वनीकरणातून वृक्षलागवड करून वनउद्यान उभारले. तत्कालीन आमदार सुजित मिणचेकर व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले.


वनहद्दीत दोन उद्याने, खेळणी, विहीर, पाच खोल्या, स्वच्छतागृह, वनकुटी आणि मनोरे उभारले. दीड वर्षे या सुविधांचा चांगला वापर झाला; मात्र गस्त कमी झाल्यानंतर साहित्याची मोडतोड झाली. कोरोना काळात काही साहित्य लंपास झाले. उद्यानाची कमान कोसळली आहे. असाच काहीसा प्रकार पन्हाळा येथे घडला आहे.


मसाई पठाराकडे जाणार्‍या मार्गावर वनविभागने साहसी खेळांसाठी प्रकल्प उभारला. जवळपास पाऊण कोटी रुपये खर्चुन लोखंडी साहित्य बसविले; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने व देखभालीअभावी तेही साहित्य तुटून पडले. कोल्हापूरात येणार्‍या सुमारे 70 टक्के पर्यटकांचा ओघ पन्हाळा येथे असतो. ऐतिहासिक वास्तू पाहिल्यानंतर पर्यटक तबक उद्यानात जात असत. येथे एकेकाळी सर्प व पक्षीसंग्रहालय होते; परंतु कायदेशीर मर्यादा व अपुर्‍या देखरेखीमुळे ते बदं झाले.


नैसर्गिक अधिवासाची सुविधा असूनही बोंडला अभयारण्याच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्याबाबत उदासीनता दिसते. तबक उद्यानातील चिरा बांधकामाची विहीर स्वच्छ करण्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. दहा वर्षापूर्वी दररोज 700 हून अधिक पर्यटक येथे येत असत, आज हा आकडा 100 ते 200 पर्यंत घसरला आहे. आजरा येथील रामतीर्थ धबधबा परिसरातील खेळणी, सुविधा लुप्त झाल्या आहेत.


विशाळगड मार्गावरील ‘वाघझरा’ येथे केवळ सिमेंटचे बांधकाम उरले असून, लोखंडी साहित्य मोडले आहे. जंगलात पर्यटकांचा वावर वाढल्यास काही पर्यटकांकडून हानी होण्याची शक्यता असते. मर्यादित भागातच पर्यटनास परवानगी दिली जाते.


दोन ते पाच किलोमीटर परिसरात पर्यटक़ांना फिरता येते. मात्र, नुकसान टाळण्यासाठी वनरक्षक व वनमजुरांचा पुरेसा बंदोबस्त आवश्यक असतो. बहुतांश मनुष्यबळ कार्यालयीन कामात गुंमतल्याने बंदोबस्त कमी पडतो. परिणामी कचरा, तोडफोड वाढते. ही परिस्थिती टाळण्यासाठी सक्षम नियेाजन व देखरेख करणे गरजेचे आहे.

पंकज कदम

पर्यावरण व पर्यटन अभ्यासक

Comments


bottom of page