top of page

गणेशोत्सव, ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमिवर शांतता समितीची बैठक


तलासरी : गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तहसील कार्यालय, तलासरी येथे तालुका स्तरीय समन्वय समिती आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस परिसरातील सरपंच, उपसरपंच, मंडळ पदाधिकारी, शांतता समिती, महिला दक्षता समिती सदस्य, साउंड सिस्टीम धारक, पोलीस पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी अशा सुमारे ३५० प्रतिनिधींची उपस्थिती होती.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अंकिता कणसे, तहसीलदार अमोल पाठक आणि पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत MSEB, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, नगरपंचायत व BDO कार्यालयाच्या प्रमुखांनीही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.


प्रशासनाच्या वतीने दिलेल्या सूचनांमध्ये गणेश मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करणे, ‘आपले सरकार’ पोर्टलवर स्पीकरसाठी परवानगी घेणे आणि साउंड सिस्टीमचे डेसिबल मर्यादेत ठेवणे यासह अनेक महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्यात आले. मंडळांनी २४ तास स्वयंसेवक नेमावेत, मूर्तीची सुरक्षितता व स्वच्छता राखावी, तसेच मद्यपान, असभ्य वर्तन व कायदा भंग टाळावा, असेही बजावण्यात आले.


मिरवणूक निश्चित मार्गावरूनच काढावी, वाहतुकीस अडथळा होऊ देऊ नये, शक्य असल्यास सीसीटीव्ही बसवावेत, इतर धर्मांच्या भावना दुखावणारे वाद्य वा घोषणा करू नयेत, अशीही सूचना देण्यात आली. देखावे पर्यावरणपूरक असावेत आणि "ऑपरेशन सिंदूर", स्वदेशी वस्तूंचा वापर व सामाजिक प्रबोधनावर आधारित विषय निवडावेत, असे प्रशासनाने सांगितले.


या बैठकीच्या माध्यमातून प्रशासनाने सर्व मंडळांना सौहार्द, सहकार्य आणि कायद्याचे भान ठेवत शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन केले.

Comments


bottom of page