गुटखामाफियांची आता खैर नाही: उत्पादक, वाहतुकदार, पुरवठादार अन् विक्रेत्यावर थेट मकोका आयएएस तुकाराम मुंढे यांचा निर्णय; पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात एफडीए विभागाकडून धाडसत्र सुरू आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाल्याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी उत्पादकांपासून ते विक्री करणार्यांवर मकोका लावणार असल्याचा इशारा दिला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कारवर्इा संदर्भात माहिती दिली.
यापूर्वी मुंडे यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशा सुचना दिल्या आहेत. दरम्यान, आता गुटखा, तंबाखु किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन,साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणार्या संघटित नेटवर्कविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 (मकोका) लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत.
“ उत्पादकांपासून ते विक्री करणार्यांपर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. मकोका गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपीचा इतिहास पाहून आवश्यक त्या गुन्ह्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
राज्यात अवैध गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट आहे. यावर मोठी कारवाई करावी लागणार आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवून, वाहतूक, वितरण आणि विक्री करणार्या संघटीत नेटवर्क विरोधात मकोका लागू करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती मुंडे यांनी दिली. या रॅकेटमध्ये आमचे काही अधिकारी देखील इनवॉल्ड आहेत, असे आरोप होत आहेत. याची चौकशी आम्ही करत आहे. अधिकारी जर सहभागी असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
सार्वजनिक आरेाग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना जारी केलेल्या आदेशानुसार कवेळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे, तर उत्पादक,पुरवठादा, वाहतुकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते आणि संपूर्ण वितरण साखळीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुटखा आणि निकोटीनयुक्त पानमसाल्यावर आधीपासूनच बंदी आहे. मात्र बनावट कागदत्रे, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे आणि आंतरराज्य पुरवठा साखळीच्या माध्यमातून हा व्यापार सुरू असल्याचे अनेक तपासांतून समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांकडे आता केवळ अन्नसुरक्षा उल्लंघन म्हणून नव्हे, तर संघटित गुन्हेगारी म्हणून पाहिले जाणार आहे.
मकोका लागू झालेल्या प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन मिळवण्यासाठी कठोर दुहेरी अटींचा समाना करावा लागणार आहे. तसेच सरकारी अभियोक्ता, पोलीस आणि एफडीए यांच्या समन्वय ठेवून जामिनाला प्रभावी विरोध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, “ सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणार्यांवर आता मकोका अंतर्गत कारवई होईल. कायद्याचे पालन करणार्या व्यापार्यांना त्रास देण्याचा उद्देश नाही. मात्र संघटितपणे प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार करणार्या व्यक्ती, संस्था आणि नेटवर्कविरुद्ध कठोेर कारवाई केली जाणार आहे.
या शिवाय प्रत्येक जिल्ह्यात मकोका पात्रता, एफआयआर, आरोपपत्रे आणि जप्ती कारवाईची स्वतंत्र नोंदवही ठेवली जाणार असून सह आयुक्त स्तरावर दरमहा त्याचा आढावा घेतला जाणार आहे. एफडीए च्या या निर्णयामुळे राज्यातील गुटखा माफिया आणि अवैध तंबाखू व्यापार करणार्या संघटित टोळ्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.



Comments