top of page

गेवराईतील राडा अंगलट, लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा

ree


बीड: आमदार विजयसिंह पंडीत समर्थक आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमधे 25 ऑगस्ट रोजी गेवराईत राडा झाला. गाडीवर दगड व चप्पल फेकल्याचा आरोप हाके यांनी केला, तर हाके यांनी आमदार विजयसिंह पंडीत यांच्यावर आर्वाच्च भाषेत टीका करत गेवराईमध्ये येऊन दंड थोपटत चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला. आता या प्रकरणावरून पोलिस प्रशासनाने सुमोटो अंतर्गत लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ‘ चलो मुंबई’ आंदोलना समर्थनार्थ लावलेल्या बॅनर वरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार विजयसिंह पंडीत यांच्या वाद निर्माण झाला. दरम्यान, आमदार पंडीत यांनी लावलेल्या बॅनरमुळे मतदारसंघात सामाजीक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करत हाके यांनी आमदार पंडीत यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली.


हाके यांच्या टीकेला प्रत्यूत्तर देत आमदार पंडीत यांनी हाके यांना ‘प्रिपेड श्वान’, रिचार्ज केल्यावरच भुकतो आणि कोणाची सुपारी घेवून भुकतो ही माहित असल्याचा आरोप करत हाकेच्या टीकेला जोरदार प्रत्यूतर दिले होते. यानंतर आमदार पंडीत समर्थकांनी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाके यांच्या प्रतिमेस जोडे मारत पुतळ्याचे दहन केले.


त्यानंतर हाके यांनी आमदार पंडीत यांना डिवचत “ माझा पुतळा काय दहन करतो, तुझ्या पार्श्वभागात दम असेल तर आजच मी गेवराईत येतो आणि मला जाळून दाखव , हरामखोर” असे म्हणत पंडीत समर्थकांना चॅलेंज दिले. सायंकाळी 5:30 च्या दरम्यान हाके गेवराई कडे येत असताना पोलिसांनी त्यांना शहरात जाण्या ऐवजी बायपास ने पुढे मार्गस्थ होण्याचा सल्ला दिला.


मात्र, हाके यांनी पोलिसांचा सल्ला झुगारून गेरवाई शहरात दाखल झाले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या मते शहरातील छत्रपती शिवाजी चौकात हाके समर्थकांनी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. सत्कारानंतर हाके यांनी आमदार पंडीत यांच्यावर टीका करत दंड थोपटत पंडीत समर्थकांना डिवचले त्यांनतर हाके यांच्या गाडीवर दगड आणि चप्पल फेकल्याचा आरोप हाके समर्थकांनी केला. हाके समर्थक गाडीवर चढून हातात काठ्या फिरवत असल्याचा आरोपही पंडीत समर्थकांनी केला.


यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी मोठ्या शिताफीने हे प्रकरण हाताळत गर्दी पांगवली आणि हाके यांचा रस्ता मोकळा करून दिला. यावर आता गेवराई पोलिसांत हाके यांच्यासह 14 जणांविरोधात सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments


bottom of page