छत्रपती संभाजीगरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा एल्गार; विभागीय आयुक्तालयासमोर धरेण आंदोलन
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 2 min read
प्रा. विठ्ठल कांगणे सर यांच्या नेतृत्वात आंदोलनास प्रतिसाद; आमदार रोहित पवार, अभितीत दिपकेंची उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर: राज्यभरातील स्पर्धा परीक्षा आणि विविध शासकीय भरती प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून होणार्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाविरोधात आज सोमवारी (दि.6) छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर हजारो विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश पाहायला मिळाला. ‘ महाराष्ट्र राज्या विद्यार्थी कृती समिती’ च्या वतीने व नामवंत व्याख्याते प्रा.विठ्ठल कांगणे सर यांच्या पुढाकारातून येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार रेाहित पवार यांनी विशेष उपस्थिती लावून आंदोलक विद्यार्थ्यांना संबोधित केले व विधानसभेपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्याचा शब्द दिला.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात महत्वाच्या आणि प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने एमपीएससी कडून सुरू करण्यात आलेली नवीन ऑनलाईन परीक्षा पद्धत तात्काळ रद्द करून ती पूर्वीप्रमाणेच पारदर्शक ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, राज्यातील शासकीय पेपरफुटीच्या घटना कायमच्या रोखण्यासाठी अत्यंत कठोर कायदा लागू करावा, आणि गुणांच्या नॉर्मलायझेशनची क्लिष्ट पद्धत तात्काळ हद्दपार करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. याशिवाय शिक्षकांसाठीची बंधनकारक टीईटी परीक्षा रद्द करावी, आगामी पोलिस भरतीसाठीची वयोमर्यादा वाढवून मिळावी, एमपीएससीकडे वर्ग केलेल्या गट-क आणि गट-ड (वर्ग 4) च्या हजारो पदांच्या रखडलेल्या भरतीचा अधिकृत सिलॅबस जाहीर करावा, आणि वेगवेगळ्या परीक्षांसाठी हजारे रुपये शुल्क न आकारता संपूर्ण वर्षासाठी एकच ‘ वन-टाईम’ परीक्षा शुल्क लागू करावा, या मुख्य मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाले.
विद्यार्थी प्रतिनिधीं म्हणाले की, या सर्व मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकारकडे वारंवार निवेदने देऊन, मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि चालू विधानसभा अधिवेशनातही आमदारांमार्फत लोकशाही मार्गाने आवाज उठवण्यात आला आहे. परंतु, सत्ताधारी प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही न होता केवळ दिरंगाई केली जात असल्याने अखेर विद्यर्थ्यांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीने विभागीय आयुक्तांना मागण्यांचे अधिकृत निवेदन देण्यात आले. जर येत्या 12 जुलै 2026 पर्यंत शासनाने या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र आणि उग्र स्वरुपाचे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामध्ये राज्यातील अनेक प्रमुख सामाजिक आणि राजकीय नेते छत्रपती सभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. योवळी व्यासपीठावर प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितेश कराळे सर, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, शेतकरी नेते रविकांत तुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, दिपक केदार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार संजय काळे, माजी आमदार संजयभाऊ वाघचौरे यांच्यासह विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अहोरात्र काम करणारी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. संपूर्ण मराठवाडा आणि राज्यभरातून आलेले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.



Comments