जरांगे पाटील हत्या कट प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी
- Navnath Yewale
- Nov 14, 2025
- 2 min read

जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आल आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्या प्रकरणातील आरोपींची पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अमोल खुणे, दादा गरुड, कांचन साळवीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जरांगे पाटील हत्ये कटप्रकरणातील आरोपींना आज जालन्यातील अंबड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकार्यांच्या कोर्टात पोलिसांनी आज हजर केले होते. यावेळी न्यायालयानं त्यांना पोलिस कोठडीतून न्यायालयीनं कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दादा गरुड आणि अमोल खुणे यांना अटक केली होती. त्यानंतर 11 नोव्हेंबरला रात्री उशीरा कांचन साळवी यास पोलिसांनी अटक केली होती. दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे याचा पीए असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, मागील पंधरवाड्यात बीडमधून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली होती. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांत ही हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं.
धक्कादायक म्हणजे कट रचणारा हा बीडच्या परळीतील एक बड नेता असल्याचा आरोप केला जात आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट बीड जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीत रचण्यात आला होता. त्याच बैठकीत असलेल्या समर्थकाने जरांगे पाटील यांना ही बाब सांगितली. त्यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी रात्री पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार केली होती. जरांगे यांनीही पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली.
या तक्रारीनुसार पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले होते. त्यातील एक संशयित हा जरांगे पाईल यांचा जुनाच सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माझ्या खुनाचा कट रचला गेला हे सत्य आहे. कट शिजला गेला. यासंदर्भात पोलिस अधीक्षक स्वत: लक्ष घालून आहेत. तपासात दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असे जरांगे पाटील म्हणाले होते. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले होते.
धनंजय मुंडेंची मागणी: मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेनीही याला उत्तर देत जरांगे पाटलांचे आरोप फेटाळले होते. तसंच या संपर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज जरांगेंची नार्कोटेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली होती.
जरांगे पाटलांचा थेट अर्ज: धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांचे आरोप फेटाळत सीबीआय, नार्कोटेस्टची मागणी केल्या नंतर जरांगे पाटील यांनी उत्तरादाखल पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आपन कोणत्याही चौकशीला तयार आहोत माझी आणि त्याची (धनंजय मुंडे) याची सोबतच नार्कोटेस्ट करा अशी मागणी करत थेट पोलिस अधीक्षकांकडे नोर्कोटेस्टचा अर्जच त्यांनी दिला.



Comments