top of page

जरांगेंच्या टीकेने मंत्री बावनकुळे भावूक, उत्तर देताना डोळ्यात पाणी पत्नी, मुलांना, बहिणीलाही त्रास होतोय, टीका करून आनंद मिळत असेल, तर खुशाल करावी

पुणे : ‘माझ्यावर व्यंग करून त्यांना आनंद मिळत असेल तर मिळू द्या. मी काहीच बोलणार नाही. पण घरी बायको, मुलं बहीण, माझं कुटुंब आहे. त्यांनाही याचा त्रास होतो’ अशा भावनिक शब्दांत मराठा- कुणबी जात प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होणार्‍या टीकेला महसून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. उत्तर देताना भावूक झालेल्या बावनकुळे यांच्या डोळ्यात पाणी आल्याचेही दिसून आले. ते पुण्यात पत्रकार परीषदेत बोलत होते.


बावनकुळे म्हणाले, “ माझ्यावर टीका करून न्याय मिळत असेल तर त्यांनी खुशाल टिंगल-टवाळी करावी. काय गैरसमज झाला आहे, माहिती नाही. पण मी कधी जाती- पातीकरत नाही.” आपल्या कुटुंबाचा संदर्भ देत , “ माझी पत्नी कुणबी आहे, सुनबाई मराठा आहे. आम्ही कुणबी, तेली, मराठा असा वाद करत नाही. आमचा पण परिवार आहे, ” असे सांगताना बावनकुळे भावूक झाले.


कुणबी जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेवरही बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले, “ महसूलकडून कुणबी जात प्रमाणपत्र दिलं आहे. खात्याने एवढं काम केल्यानंतर जर व्यंग होत असेल तर याला काही अर्थ नाही. 22 लाख प्रमाणपत्रांमधील एक प्रमाणपत्र चुकीचं आलं होतं. तयवरही मी चौकशी लावली होती. तेही क्लिअर झालं आहे. आताही कुणबी प्रमाणपत्रं रोज दिली जात आहेत,” असंही बावनकुळे म्हणाले.


पुढे बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, “ माझे आणि जरांगेचे अनेकदा बोलणे झाले आहे. पण एका प्रमाणपत्रामुळे गैरसमज झाले आहेत. तरीही माझ्यावर व्यंग करून आनंद मिळत असेल तर त्यांनी तो घ्यावा.” अशी उद्विग्नता बावनकुळे यांनी व्यक्त केली. जात वैधता प्रमाणपत्राचा विषय आपल्यवा अखत्यारित नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. “ व्हॅलिडिटी माझं काम नाही, ते समाजकल्याणकडे आहे. कास्ट व्हॅलिडिटीमध्ये काय झालं असेल तर मला माहिती नसल्याच” ते म्हणाले.


“ ओबीसी आंदोलनकांना विनंती करतो, कोणीही रस्त्यावर आंदेालन करू नका. सरकार म्हणून विनंती आहे की रस्त्यावर आंदोलन करू नका. यातून सामाजिक वाद निर्माण होतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कायदेशीर लढा लढता येतो. ओबीसी समाजाने कोणताही वाद करू नये.

Comments


bottom of page