सर्पदंश मृत्यू प्रकरण कारवाईचा फास आवळला: मुख्यध्यापकासह अधिक्षक, अधिक्षिकेवर अखेर गुन्हा; आश्रमशाळा कायमस्वरुपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 2 min read

गडचिरोली : गडचिरोली जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी संर्पदंश प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालंय, तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी अखेर आश्रमशाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निष्काळतीपणा समोर आल्यानंतर मोठी कारवाई केली आहे. यात मुख्यध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भाष्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्या संहितेतील विविध कलमांसह बाल न्याय अधिनियमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, 10 ऑगस्टच्या पहाटे संर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या फियादीवरून 12 ऑगस्टच्या पहाटे धानोरा पोलिसांनी ही कारवई केली. जपतलाई आश्रमशाळेतील निष्काळजीपणाच्या आरोपांवर आता पहिली कायदेशीर कारवाई सुरू झाली असून, या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे, गडचिरोली आश्रम शाळेत सर्प दंश केल्यावर हेलिकॉप्टरने नागपुरात उपचारासाठी आणलेल्या विद्यार्थीनीची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे. हाय फ्लो ऑक्सिजनचीही गरज नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रकृतीत सुधारणा कायम राहिल्यास दोन-तीन दिवसात सुट्टी मिळण्याची शक्यता देखील डॉक्टरांनी वर्तवली आहे. तर मुलीला अत्यावस्थ अवस्थेत विशेष हेलिकॉप्टरने नागपुरात आणण्यात आले हाते. मेडिकलमध्ये दाखल केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांनी तातडीने विष प्रतिबंधक औषधांसह आवश्यक उपचार सुरू केले. परिणामी विद्यार्थिनीची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.
गडचिरोलीच्या धानोरे येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेल्या असताना रात्री दोन ते अडीच वाजाताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर विद्यार्थीनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दिपीका लकडा आणि इयत्ता आठवितील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला. दरम्यान, इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवितील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थीनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.) यापैकी समृद्धी सुरेश नैतम हिची प्रकृती गंभीर आहे.



Comments