top of page

जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीत स्थानिकांना 70 टक्के जागा राखीव भूमीपूत्रांच्या रोजगारासाठी राज्य सरकाराचा महत्वकांक्षी निर्णय

मुंबई : महायुती सरकारने भूमिपूत्रांच्या रोजगारासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापूढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती करताना 70 टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपूत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्याच जिल्ह्यात नोकरीची संधी मिळणार आहे.


राज्य सरकारने स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार देण्यासाठी महत्वाचा निर्णय जारी केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील रिक्त पदांची भरती करताना आता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपूत्रांना संधी दिली जाणार आहे. सध्या राज्यात 39 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. या जिल्हा सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र आणि सभासद त्या-त्या विशिष्ट प्रश्नांची जाण असलेले कर्मचारी मिळाल्यास या बँकांच्या ग्राहकांना आणि सभासदांना चांगली दर्जेदार सेवा देता येईल. या उद्देशाने सरकारने हा बदल केला आहे.


जिल्हा बँकांना नोकरभरती करताना यापुढे नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे संबंधित बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी (डोमासाइल प्रमाणपत्र धारक) उमेदवारांना यापूढे नोकरीत 70 टक्के जागा राखीव राहणार आहे. उर्वरित 30 टक्के जागांवर जिल्ह्याबाहेरील उमेदवार अर्ज घेऊ शकतात. जर या 30 टक्के कोट्यात जिल्ह्याबाहेरील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर त्या जागा देखील स्थानिक उमेदवारांमधून भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या बँकांनी या निर्णयाच्या आधी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परंतु ज्यांची भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अशा बँकांनाही हा नवीन 70.30 चा नियम पाळावा लागणार आहे.


दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकांची ओळख ही विकास संस्थांच्या ‘ मातृसंस्था’ अशी असते. गावातील विकास संस्थांचे अस्तित्व या बँकावर अवलंबून असते. स्थानिक तरुणांची भरती झाल्याने बँकेचा कारभार अधिक लोकाभिमुख होईल आणि शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा तसेच इतर सुविधा मिळताना येणार्‍या विविध अडचणी दूर होतील, असा विश्वास सहकार विभागाने व्यक्त केला आहे.

Comments


bottom of page