ठाकरे आणि शिंदे यांचा कौटुंबिक दिल्ली दौरा
- Navnath Yewale
- Aug 10
- 3 min read

सुडाच्या भावनेने पेटलेल्या नेत्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील वैचारिकता संपुष्ठात आली. नेत्यांचाच एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. निवडणूकांपुरतेच राजकारण अशी ओळख असलेल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात सुडाच्या राजकारणाचे वारे प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोक्यात आणि घरात घोंगावू लागले. याच सुडाच्या राजकारणाचे वारे मागील आठवड्यात राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर घोंगावताना सर्वांनीच पाहिले. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री, दोन शिवसेनेचे दोन प्रमुख नेते, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वतःच्याच राजकीय पक्षाचे आराखडे दिल्लीत रचताना दिसले.
शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात होणारा निर्णय आणि महाराष्ट्र भाजपाने केलेली राजकीय कोंडी यामुळे चिंताग्रस्त असलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांच्या भेटी घेतल्या. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे अडचणीत आलेले पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना खिजविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गांधी याच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. चर्चाना उधाण आले. नाक्यानाक्यावर कार्यकर्त्यांनी अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली. असे असले तरी ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये एकच साम्य होते ते म्हणजे आपल्या कुटुंबालाच घेऊनच त्यांनी हा राजकीय दौराचा आनंद लुटला. कार्यकर्ते नाक्यावरच चर्चेत रमला.
सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाणे मागील आठवड्यात महत्वपूर्ण निकाल दिला. निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पक्षांतर रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल. वास्तविक हा निकाल तेलंगणा राज्यातील पक्षांतर करणाऱ्या दहा आमदाराबाबतचा होता. पण या निकालाचा धक्का महाराष्ट्राला अधिक बसला. कारण मागील दशकातील राजकारणातील घडामोडी पाहिल्या तर पक्षांतराची कीड सर्वाधिक महाराष्ट्राला लागलेली दिसून येईल. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागले आणि एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या गटात घुसमट वाढू लागली.
कारण तेलंगणाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्याच पक्षांतराची चर्चा आपसूकच रंगू लागली. वास्तविक अजित पवार गटानेही पक्षांतर केलेलं आहे पण अजित पवार गटाची चर्चा कोणीच करताना दिसत नाही. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही चर्चेच्या मध्यभागी दिसू लागले. कारण आमदार अपात्रतेचा निर्णय देण्यास टाळाटाळ करण्याची सर्वात मोठी भूमिका राहुल नार्वेकर यांनी बजावली होती. मुळात शिवसेनेत फूट पडल्यावर शिवसेना कोणाची! याबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णयही वादात सापडला आहेच. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे त्यावेळीच ठोठावले होते. पण त्यावर सुनावणी झालीच नाही. पण सरन्यायाधीशपदी भूषण गवई हे आल्याने आता याबाबतची सारी सुनावणी ऑगस्ट च्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला होईल आणि निर्णयही दिला जाईल अशीच जास्त शक्यता आहे.
आधीच तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समितीच्या पक्षांतर करणाऱ्या १० आमदारांच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना परखड शब्दात अधोरेखित केले की 'ऑपरेशन यशस्वी, पण रुग्ण दगावला' अशी परिस्थिती न्यायालय निर्माण होऊ देणार नाही. यामुळे केंद्रातील भाजपा सत्ताधारी पक्षाला जरी हादरा बसला. असे असले तरी केवळ सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीमध्येच नाही तर राज्यातील प्रत्येक न्यायालयातील न्यायमूर्तीमध्येही प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. एखाद्या तुमचा कॅप्टनच जर कणखर, परखड आणि लढाऊ असेल तर संपूर्ण टीममध्येच जोश निर्माण होतो. अशाच पद्धतीने देशातील सर्वच न्यायालयात सरन्यायाधीश गवई यांच्यामुळे ऊर्जा निर्माण झाली.
हे सर्व पाहता महाराष्ट्रातील राजकारणाची म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दिशा कशी फिरेल हे आजच्या दिवशी ठामपणे जरी सांगता आली नाही तरी अंदाज मात्र नक्की वर्तविता येईल. तेलंगणा राज्यातील पक्षांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळेच एकनाथ यांच्या शिवसेना पक्षांबाबत राजकीय विश्लेषकांनी, कायदेतंज्ञानी, जेष्ठ पत्रकारांनी हाच अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली. तसे पाहिले तर ज्या दिवशी सन्माननीय भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली त्यांचदिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेबाबत आणि ४० आमदारांच्या पक्षांतराबाबत चर्चा आणि अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली होती. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई हे संविधान मानणारे आहेत.
लोकशाही देशात संविधानाला मोठे महत्व आहे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रात पुन्हा चर्चा सुरु झाली होतीच. त्यातच तेलंगणा राज्याच्या पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या निकालाने या चर्चेला पृष्ठी मिळाली, एकप्रकारे ताकत मिळाली. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत जोरदार चर्चा रंगू लागली. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निर्णय येणार! धनुष्यबाण निशाणी जाणार! शिवसेना नाव जाणार! अशी उघड चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली. किंबहुना शिंदे यांचे मित्रपक्ष असलेल्या भाजपाने ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीने हि चर्चा पसरविली. यामुळे शिंदे यांच्यावर दबाव वाढत गेला. परिणामी एकनाथ शिंदे यांना दिल्लीत जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या तेलंगणा राज्यातील आमदाराबाबत दिलेल्या निर्णयानंतर केवळ तीनच दिवसात हि सारी प्रक्रिया घडली.
यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मित्रपक्ष आणि विरोधकांनी वातावरण किती वेगाने निर्माण केले याची कल्पना येते. आधीच मागील दोन महिन्यांपासून शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार आणि मंत्राचे वेगवेगळी प्रकरणे उजेडात येत आहेत. किंबहुना हि प्रकरणे जाणीवपूर्वक आणून एकनाथ शिंदे यांची प्रचंड राजकीय कोंडी विरोधकांनी केली होतीच. हि कोंडी जरी विरोधकांनी केली असली तरी विरोधकांच्या हल्लाबोलाला शिंदे यांचा मित्रपक्ष भाजपाची साथ होतीच अशीच सर्वत्र चर्चा आहे. किंबहुना शिंदे यांच्या शिवसेनेतही अशी जोरदार चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या खेड येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरच रामदास कदम यांनी ही खदखद बोलून दाखविली. यामुळे बेजार झालेले शिंदे थेट दिल्लीत पोहचले आणि शिवसेनेच्या सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
त्यानंतर शिंदे यांनी व्यक्तीगत पातळीवर शहा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेच्या वेळी जरी कोणी नव्हते त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात काय चर्चा झाली हे ठामपणे जरी सांगता आले नाही तरी हि चर्चा काय झाली याबाबत अंदाज वर्तविण्यास काहीच हरकत नाही. रात्रीचे जेवण काय केले! उद्धव ठाकरे यांचा फोन होता काय! अशी तर चर्चा नक्कीच झाली नसणार! त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात बेजार झालेल्या किंबहुना भाजपाने बेजार केलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील मानसिकता ओळखूनच अनेकांनी सूत्राचा आधार देत अंदाज मांडला. या अंदाजानुसार जर न्यायालयाने शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात निकाल दिलाच आणि 'शिवसेना' नाव व 'धनुष्यबाण' चिन्ह हातून गेले तर काय करायचे यावर चर्चा झाली असावी. असे झाले तर आमचे अस्तित्वच संपून जाईल अशीही भीती शिंदे यांनी शहा यांच्याजवळ व्यक्त केली असावी. कारण शिवसेना आणि धनुष्यबाण याच्यावरच शिंदे आणि चाळीस आमदार यांचे भवितव्य टिकून आहे. याची जाणीव सर्वांनाच आहे. तेच जर हातातून गेले तर सारे काही संपले असेच होईल. म्हणूनच जर न्यायालयाचा निर्णय विरोधात गेलाच, तर... त्यावर उपाय म्हणून शिंदे यांनी सर्व आमदारांसह भाजपात यावे अशीही चर्चा झाली असावी.
असे झाले तरच भाजपा महाराष्ट्रात मजबुत होईल अशी भाजपाची खेळी असणार. हि अट एकनाथ शिंदे यांना मान्य करावीच लागेल असेच एकंदरीत राजकीय वातावरण आहे. त्यासाठीच एकनाथ शिंदे यांची मागील चार महिन्यांपासून भाजपा राजकीय कोंडी करीत आहे. जर शिंदे यांचा गट भाजपामध्ये सामिल झालाच तर शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरतीलच कारण फडणवीस हे जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी नाराज झालेले एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित शहा म्हणाले होते की.. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केले होते. आता मुख्यमंत्री भाजपाचाच राहणार! तुम्ही भाजपात या आम्ही तुमचा विचार करू! यावरूनच असे म्हणता येईल की जर शिंदे भाजपात गेले तर फडणवीस यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
असे जरी असले तरी भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे हे शिंदे यांच्यासह ४० आमदारांना विसरून चालणार नाही. त्यामुळेच भाजपात शिंदे गट सामिल होताच शिंदे यांचा मंत्रिमंडळातील शिवसेनेचा कोटाही आपोआप समाप्त होईल. इतकेच नाही तर कोणाला मंत्रीपद द्यायचे कोणाला कोणते खाते द्यायचे हे सारे अधिकार भाजपाचे फडणवीस आणि अमित शहा यांच्याजवळच असणार आणि तेच ठरविणार हे निश्चितच. आजपर्यंत शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंडखोरी झाली त्याचा इतिहास पहा. ज्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली तेच नेते इतर पक्षात टिकले. पण त्यांच्या सोबत गेलेल्या सर्वच आमदारांचे, पदाधिकाऱ्यांचे राजकारण संपले. मग ते छगन भुजबळ असो, गणेश नाईक असो किंवा नारायण राणे असो. यांच्या सोबत गेलेल्या सर्वांचेच राजकारण संपुष्ठात आले. विजय वडेट्टीवार सारखे विदर्भातील मजबुत नेतृत्व असल्याने ते काँग्रेसमध्ये टिकले. आता एकनाथ शिंदे यांची वेळ आली आहे. जर शिंदे भाजपात सामिल झालेच तर त्यांच्यासोबतचे भाजपात कितीजण टिकाव धरतील हि येणारी वेळच ठरवेल त्यावर आत्ताच अंदाज व्यक्त करणे चुकीचे ठरेल.
शहा आणि मोदींना खिजविण्यासाठीच
याच काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेहि दिल्लीत दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांचा दौरा तसा नियोजित होता. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची रीतसर माहितीही पत्रकारांना मुंबईतच दिली होती. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार आहेत. याकाळात ठाकरे इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार. राहुल गांधी यांच्या घरी उद्धव ठाकरे जेवणाचा आस्वाद घेतील. राहुल यांनीच ठाकरे कुटुंबाला जेवणाचे आमंत्रण दिले आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले होते. असे जरी असले तरी उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या वैठकीत तितकेसे सारस्व नाही असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून हे काही लपून राहिलेले नाही. किंबहुना राहुल गांधी यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण मिळाले म्हणून उद्धव ठाकरे यांना भयंकर आनंद होईल असेही नाही.
पण ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि दुसऱ्याच्या हाती सोपविली ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना जास्तीतजास्त कसे खिजविता येईल यातच उद्धव ठाकरे यांना जास्त आनंद आहे. याच संधीची उद्धव ठाकरे नेहमीच वाट पाहत असतात. म्हणूनच संसदेचे जेव्हा अधिवेशन सुरु झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रश्नांनी काँग्रेसचे राहुल गांधी आणि विरोधकांनी भडीमार केला, त्यावेळी उद्धव ठाकरे यांना खऱ्या अर्थाने आनंद झाला असावा. त्यातच लोकसभा निवडणुकीत 50 हुन अधिक जागेवर मतदार यादीत घोळ करून कशा पद्धतीने जिंकल्या असा आरोप राहुल गांधी यांनी केला आणि पुराव्यासह पत्रकारांसमोर सादरीकरण केले. एका एका घरात ८० - ८० मतदार राहतात हे सादरीकरणात पुराव्यासह राहुल गांधी यांनी दाखविल्यामुळे निवडणूक आयोगाचे धाबेच दणाणले आणि देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यातच संसदेत 'ऑपरेशन सिंधुर' 'पुलवामा' 'पहेलगाम' मधील अतिरेक्यांचा हल्ला यावरून राहुल गांधी आणि विरोधकांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेछूट आरोप केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच पाकिस्तान भारत युद्ध थांबविले याबाबत खुलासा करावा अशीही मागणी विरोधकांनी केली.
यामुळे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री पार अडचणीत सापडले. हे सारे कमी म्हणून काय संसदीय अधिवेशन सुरु असतानाच ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्याने पंतप्रधान मोदी अजूनच अडचणीत आले. यामुळे सर्वात जास्त आनंद उद्धव ठाकरे यांना झाला असावा आणि त्याच आनंदाच्या भरात उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक राहुल गांधी यांच्या घरी कुटुंबासह जेवणाचा आस्वाद घेण्याचे ठरविले असावे. यामागे गांधी प्रति आस्था आहे असे वाटण्याचे अजिबात कारण नाही. तर यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना खिजवीण्यांचाच उद्देश जास्त असावा. आणि ते साहजिकच आहे. जेव्हा राजकारणात सत्ताधारी व्यक्तीशी लढणे मूर्खपणाचे समजले जाते तेव्हाच याच नितीचा मार्ग अवलंबिला जातो.
अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांची शिवसेना ज्या पद्धतीने फोडली आणि दुसऱ्यांच्या हाती सोपवली हि गोष्ट उद्धव ठाकरे यांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या जिव्हारी प्रचंड लागली. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हटले जाते. असे असले तरी राजकारणात कायम तीच परिस्थिती राहतही नाही हेही तितकेच सत्य असते. संधीची वाट पाहणे हाच त्यातील मार्ग असतो. त्याच पद्धतीने उद्धव यांनी मागील तीन वर्षे संधीची वाट पाहिली. त्यातून त्यांनी स्वतःला सावरले. पण आता संधी समोर दिसत आहेच असे समजताच उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासहीत दिल्ली गाठली. याचे सर्वात मोठे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी आलेले भूषण गवई. गवई हे संविधान जपणारे आहेत, संविधानाला धरूनच निर्णय देणारे आहेत. यामुळेच अनेकांप्रमाणे उद्धव ठाकरे यांचाही आत्मविश्वास वाढला.
त्यातच राज ठाकरे सोबत आल्याने उद्धव ठाकरे यांच्या आत्मविश्वास आणखीनच वाढलेला होताच. राज सोबत असल्याने मुंबई महापालिकेची चिंता नाहीच पण ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक या महापालिकाही खेचून आणता येईल असाही आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेला आहे. म्हणूनच यावेळच्या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे तितकेसे चिंताग्रस्त दिसले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि मिस्किलपणा दिसत होता. राहुल गांधी यांच्या घरी जाऊन जेवणाचा आस्वाद घेण्याच्या आनंदापेक्षा या जेवणाने मोदी आणि शहा यांना कसे खिजविले याचा आनंद अधिक होता असेच म्हणावे लागेल एकंदरीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील दोन शिवसेनेच्या या दोन नेत्यांनी आपल्या कुटुंबासह दिल्लीचा राजकीय दौऱ्याचा आनंद घेतला आणि या दौऱ्याची नाक्यावर उभे राहून कार्यकर्त्यांनी फक्त चर्चा करून एकमेकांवर आरोप केले. यालाच राजकारण म्हणतात.
सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक,
संपादक, 'वृत्तमानस' मुंबई.
रविवार दि. १० जुलै २०२५
दूरध्वनी : ८९२८०५५९२७*
Comments