हिंदीची सक्ती ते दुबार मतदार...राज ठाकरेंच्या नेतृत्वावार शिक्कामोर्तब
- Navnath Yewale
- Nov 9
- 4 min read

मतदार यादीतील दुबार नावामुळे विरोधकांनी केलेलं आंदोलन, मतदार याद्या स्वच्छ केल्या नाहीत तर निवडणुका होऊ देणार नाही! असा राज ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि पाठोपाठ निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका यामुळे राज ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नगरपालिकेच्या निवडणुका होऊ देणार! की EVM मशिन्स फोडण्याचे आदेश मिळणार! याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
मागील चार महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नेतृत्व महाराष्ट्रात मोठे केले जाण्याची शक्यता अधिक आहे. अशीच चर्चा राजकारणातील वरिष्ठ पातळीवर होऊ लागली आहे. शिवसेनेबाबत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचाच फार्मुला मुख्यमंत्री फडणवीस वापरतील अशीही चर्चा आहे. या चर्चेतील सत्यता किती हे येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने लवकरच महाराष्ट्राला दिसून येईल.
महाराष्ट्रातील २४६ नगरपंचायत आणि ४२ नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकारणाची नशा महाराष्ट्रात हळूहळू चढू लागली आहे. राजकारणाच्या या नशेची झिन्ग कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत जेव्हा चढू लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने राजकारण रंगात आलेले दिसेल. असे म्हटले जाते की..राजकारणात नेहमीच विचार बदलत असायला हवे ते ठाम असता कामा नये. वेळेनुसार आणि काळानुसार जे राजकीय पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आपला विचार बदलत असतात त्यांचीच सत्तेवर आणि राजकारणावर चांगली पकड असते.
महाराष्ट्रातील आणि देशाच्या राजकारणातील हा इतिहास आहे. या तत्वाचे ज्यांनी पालन केले त्यांनीच सत्ता काबीज केली देशावर आणि महाराष्ट्रावर त्यांनीच राज्य केले आणि तेच मस्तीत राहू शकले जगू शकले. याच तत्वाच्या आधारावर काँग्रेसने देशावर तब्बल ६० वर्षे तर महाराष्ट्रावर ५० वर्षे राज्य केले सत्ता काबीज केली. आता याच तत्वाला समोर ठेवून भाजपाने तब्बल एक तप आपल्या हातात सत्ता कायम ठेवली. इतकेच नाही तर ही सत्ता आपल्या हाती कायम हवी असेल तर विरोधकच संपवून टाकणे किंवा विरोधी पक्षातील आपल्याच माणसाचे नेतृत्व मोठे करणे हे तत्व भाजपाने डोळ्यासमोर ठेवले. याच तत्वानुसार भ्रष्टाचारी काँग्रेस नेत्यांना भाजपाने आपल्यासोबत घेतले आणि त्यांना सत्तेतील वाटाही दिला. यात चुकीचे आहे किंवा भाजपाने फार मोठे पाप केले असे अजिबात नाही. कारण आपल्या हाती सत्ता असणे हे जसे काँग्रेसला महत्वाचे वाटत होते त्याच पद्धतीने भाजपाला वाटू लागले आहे. कारण ज्याप्रमाणे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही त्याचप्रमाणे सत्तेशिवाय शहाणपण येत नाही हेही तितकेच खरे आहे.
म्हणूनच काँग्रेसने ज्या पद्धतीने अनेक प्रादेशिक पक्ष आणि त्या पक्षाचे नेतृत्व राज्या राज्यात उभे केले मोठे केले आणि दिल्लीची सत्ता आपल्या हाती कायम ठेवली त्याचमार्गाने भाजपाने जायचे ठरविले आहे. राजकारणातील या तत्वानुसार मागील वर्षभरात महाराष्ट्रातील राजकारणात घडलेल्या घडामोडी पाहता राज ठाकरे यांचे नेतृत्व मोठे करण्यासाठी भाजपाचे देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. त्याचाच पाहिला भाग लोकसभा निवडणुकीत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील झालेली भाजपाची जाहीर सभा. या सभेत व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी केलेले भाषण.
या भाषणात राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने कोणत्याही अटी आणि शर्थी न ठेवता भाजपाला दिलेला 'बिनशर्त' पाठिंबा. राज ठाकरे यांनी दिलेल्या या बिनशर्त पाठिंबा मुळे राज ठाकरे यांचे नाव मोदी यांच्या गुड बुक मध्ये आपसूकच लिहिले गेले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची पहिली खेळी यशस्वी झाली. कारण कोणत्याही राजकीय पक्षाला महाराष्ट्रात ठाकरे नावाची जोड घ्यावीच लागणार. यात शंका घेण्याचे कारणच नाही. परंतु भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठींबावरुन शिवसेनेने राज ठाकरे यांची जोरदार खिल्ली उडविली होती. राज ठाकरे यांच्या या पाठिंबा बाबत बोलताना खुद्द उद्धव ठाकरे असे म्हणाले होते की 'बिनशर्त' नाही तर 'बिनशर्ट' पाठिंबा आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी भाजपाला दिलेल्या पाठिंबामुळे महाराष्ट्रातील मराठी जनतेत प्रचंड नाराजी पसरली असल्याचे बोलले गेले.
लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाला मिळालेल्या नगण्य विजयामुळे ते सिद्धही झाले. याचा अर्थ राज ठाकरे यांनी भाजपाला पाठिंबा दिला म्हणून भाजपाला अपयश आले असे होत नाही. तर..शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांचे नसून माझे आहे असे सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपाने आशीर्वाद देऊन मुख्यमंत्री केले त्याचेच उट्टे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी काढले किंबहुना त्याच एकनाथ शिंदे यांनी राज यांच्या घरी जावून मला राज ठाकरे यांचा पाठिंबा आहे असे भासविण्याचा किंवा दाखविण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच राज ठाकरे यांच्याबाबत शिवसैनिक नाराज होते. त्यामुळे केवळ राज ठाकरे यांनाच सोबत घेऊन चालणार नाही तर उद्धव ठाकरे यांना सोबत घेतले तर आणि तरच महाराष्ट्रातील मराठी जनता आणि शिवसैनिक आपल्यासोबत येऊ शकतील हे गणित भाजपाने म्हणजेच फडणवीस यांनी तयार केले.
म्हणूनच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत न घेता निवडणुका लढल्या गेल्यात. या निवडणुकीत भाजपाला १३५ जागांवर विजय मिळवीता आला याबाबत कोणाचे तितकेसे म्हणणे नव्हते आणि आजही नाही. परंतु एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड राजकीय वातावरण असूनही शिंदे यांच्या शिवसेनेला ६६ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४५ जागांवर मिळालेल्या विजयाबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यामुळेच विजयाच्या दिवशी सर्वत्र सन्नाटा पसरलेला होताच. आता याबाबत सारेच बोलताना दिसत आहेत.
किंबहुना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विजयी मिळालेल्या जागांची संख्या पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धक्का बसला असावा असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायम स्वरूपी दबाव राहावा यासाठीच दिल्लीश्वरांनी निर्माण केलेला हा आराखडा असावा असेही म्हणावे लागेल. रचलेल्या या आराखड्यानुसारच एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीत जाऊ लागले आणि मुख्यमंत्री पद मागून देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणू लागले हे आता काही लपून राहिलेले नाही. परंतु फडणवीस राजकारणात कसलेले असल्याने एकनाथ शिंदे यांची अजिबात डाळ शिजू शकली नाही.शिजू शकणारही नाही.
सारे काही पंतप्रधान पदासाठी
महाराष्ट्रात सुरु असलेली ही सारी लढाई देशाच्या पंतप्रधान पदासाठी आहे हे सर्वांनाच माहित आहे. वयाची ७५ ओलांडली की त्या व्यक्तीने सक्रिय राजकारणातून बाहेर जावे असा नियम भाजपाने २०१४ साली तयार केला. भाजपा वरिष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना सक्रिय राजकारणातून बाहेर काढण्यासाठीच हा नियम करण्यात आला अशी त्यावेळी उघड चर्चा होती. त्यामुळेच याच नियमाचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर २०२५ साली सक्रिय राजकारणातून दूर जातील अशी भाजपासह सर्वांचीच अपेक्षा होती. ती आता फोल ठरली हा भाग वेगळा. परंतु तसे झाले असते तर...पंतप्रधान पदासाठी दावेदार कोण! असा प्रश्न निर्माण झाला असताच. नरेंद्र मोदी नंतर त्यांचे वारस म्हणून अमित शहा यांचे नाव चर्चेत होते पण उत्तरेकडील भाजपा लॉबीचा अमित शहा यांना विरोध होईल अशी सर्वत्र चर्चा पसरू लागली किंबहुना अमित शहा विरोधकांकडून ती व्यवस्थित रित्या पसरविण्यात आली.
त्यामुळे आदित्यनाथ योगी आणि महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मधल्या काळात राजनाथ सिंह यांचेही नाव चर्चेत आले पण ते तात्पुरते होते. तसे पाहीले तर २०१४ पासूनच नरेंद्र मोदी यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात अपयशी कसे ठरवता येईल याचे आराखडे भाजपाच्या वरिष्ठ दिल्लीश्वरांनी तयार केले. यातूनच महाराष्ट्रात तोंडाफोडीचे राजकारण करण्यात आले. दाराआड दिलेला शब्द अमित शहा यांनी पाळला नाही असा आरोप प्रथम उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः चिखल केला गेला. दिल्लीश्वरांनी केलेल्या याच गलिच्छ राजकारणामुळे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात प्रचंड सेटबॅक बसलाच पण महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची नाहक बदनामी झाली किंबहुना दिल्लीश्वरांनी त्यांना जाणीवपूर्वक बदनाम केले असे म्हटल्यास ते अधिक योग्य ठरेल.
त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस अपयशी ठरले असा दिंडोरा पेटवून मुख्यमंत्री पदापासून पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवण्यात आले आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उभे करून महाराष्ट्राला मराठा नेतृत्व दिल्याचे भासविण्यात आले. त्यामुळेच मराठ्यांचे आंदोलन महाराष्ट्रात अचानक उभे राहिले आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे आला. यातही देवेंद्र फडणवीस यांना बदनाम कसे करता येईल याचा दिल्लीश्वरांनी आराखडा तयार केला आणि त्यात ते यशस्वी झालेही. कारण फडणवीस ब्राम्हण असल्यामुळे ते स्वाफ्ट टार्गेट ठरले गेले. हा सारा खेळ फडणवीस राजकारणात अपयशी कसे झाले हे दाखविण्यासाठीच खेळला गेला. मराठी माणसांमध्ये आपापसात भांडणे लावून दिल्लीत बसून आनंद घेण्याचा दिल्लीश्वरांनी प्रयत्न केला खरा पण तो यशस्वी झालाच नाही. कारण स्प्रिंग जितकी दाबली जाईल तितकीच ती वर उचलली जाते हा निसर्गाचा नियम भाजपाचे दिल्लीवाले नेते विसरलेत.
त्यामुळेच फडणवीस यांच्या स्प्रिंगने दुपटीने उचल घेत दिल्लीच्या नेत्यांना जोरदार झटका देत पुन्हा मुख्यमंत्री पद मिळविले. कारण फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय दिल्लीच्या नेत्यांसामोर दुसरा पर्यायच नव्हता. दिल्लीतील अमित शहा यांनी ज्या एकनाथ शिंदे यांना मांडीवर घेतले होते तेच महाराष्ट्राच्या राजकारणात कुचकामी ठरले गेले. त्यांना दिल्लीश्वरांनी धनुष्यबाणही दिला पण त्या धनुष्यबाणाने ते विरोधकांवर बाण सोडूच शकले नाहीत. त्या धनुष्यबाणाने त्यांचेच एकेक मंत्री गारद झालेले पहावयास मिळाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर 'मनसे' च्या वर्धापन दिन मेळाव्यात राज ठाकरे यांनी याच धनुष्यबाण बाबत स्पष्टच सांगितले होते की धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा आहे तो एकाला म्हणजे उद्धव ठाकरे यांना झेपला नाही तर दुसऱ्याला म्हणजे एकनाथ शिंदे यांना काय झेपल! राज ठाकरे यांचे म्हणणे खरे ठरले.
आज या धनुष्यबाणाचे वजन खरोखरच एकनाथ शिंदे यांना पेलवत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आणि जो उत्साह होता तसा आता दिसत नाही. याला कारण दिल्लीश्वरांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीवरील नाही तर डोक्यावर ठेवलेला हात काढला आहे. त्यातच फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आपले राजकीय वैर आटोपते घेत राजकारणात आपले वजन वाढविलेले दिसत आहे. त्यांना दिल्लीचे वेध लागलेले आहे. राजकारणात केवळ धूर्तपणा असून चालत नाही तर दूरदृष्टी पणा हवा असतो. आपण ज्यांच्या इशाऱ्यावर राजकारणात वाटचाल करणार आहोत त्यांचेही राजकारणातील वयोमान पहावे लागते. एकनाथ शिंदे या सर्व बाबतीत फारच कमी पडले. त्यांच्याजवळ धूर्तपणा निश्चित आहे पण दूरदृष्टीपणा नाही.
यामुळे सद्य स्थितीत शिंदे यांचे महाराष्ट्रातील राजकारणात वजन कमी पडले आहेच पण दिल्लीतील राजकारणही त्यांचे संपल्यात जमा आहे. फडणवीस यांनी राजकारणात जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. हे करीत असताना महाराष्ट्र आपल्या बाजूने कसा उभा राहील याची फडणवीस पूर्णतः काळजी घेताना दिसत आहे. २०२७ च्या मधल्या काळात दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. द्रौपद्री मूर्मू यांची राष्ट्रपती पदाची मुदत संपत आहे. राष्ट्रपती पदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचीही चर्चा आहेच तसे होणे अशक्य जरी असले तरी राजकारणात काहीही होऊ शकते हे नाकारून चालणार नाही. हे सारे पाहता फडणवीस यांना गाफिल राहून अजिबात चालणार नाही म्हणूनच सारी तयारी सुरु आहे. जर २०२७ ला संधी मिळालीच नाही तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून विजयी झालेले अधिकाधिक उमेदवार आपल्याला पाठिंबा कसे देतील याचाही आराखडा फडणवीस तयार करणारच.
मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत. जर २०२७ साली संधी मिळालीच तर आज नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेले चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार फडणवीस यांना पाठिंबा देतील का! हाही प्रश्न आहे. म्हणूनच संसदेत मॅजिक फिगर गाठण्यासाठी ज्या २२ खासदारांची आवश्यकता आहे ती महाराष्ट्रातून आज तरी पूर्ण होऊ शकते. एकदा मॅजिक फिगर गाठली की इतर आपोआप येतात हे राजकारणात काही नवीन नाही. हेच सारे समोर ठेवून महाराष्ट्राचे राजकारण फडणवीस खेळत आहेत. म्हणूनच राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात महत्व वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
निवडणुका होणार का!
मतदार यादीतील मतदारांची दुबार नोंदणीमुळे सत्ताधारी अडचणीत आलेले आहेत. मतचोरीचा आरोप सर्वात प्रथम काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. परंतु महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना साथ दिली नाही. 'इडी' च्या भीतीने भाजपाशी वैर घेण्याचे काँग्रेसच्या कोणत्याच नेत्यांनी धाडस केले नाही. अखेर याबाबत राज ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेत निवडणूक आयोगाविरोधात आवाज उठवीला. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज ठाकरे सोबत जावे लागले. इथेच राज ठाकरे थांवले नाहीत तर निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी जरी एकत्रित येवून मोर्चा काढला असला तरी या मोर्चाचे नेतृत्व राज ठाकरे यांनीच केलेले दिसले किंबहुना आक्रमक भाषेत राज ठाकरे यांचेच भाषण झाले.
वास्तविक या मोर्चावर भाजपा न्यायालयाच्या वतीने बंदी घालू शकली असती पण तसे झाले नाही. मोर्चाला येणाऱ्या जनतेला मुळमुळीत भाषाशैली आवडत नाही त्यांना ती कंटाळवाणी वाटते याची जाण व्यासपीठावरील इतर नेत्यांना जरी नसली तरी राज ठाकरे यांना नक्कीच आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की दुबार मतदारांची नावे बाजूला करा! मतदार यादी स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या! निवडणुका घेताना व्ही व्ही पॅट चा वापर करा. हे करायला उशीर होत असेल तर एक वर्षे निवडणुका पुढे ढकला! पाच वर्षे पुढे ढकलल्या आहेच ना! मग एका वर्षांनी काय फरक पडणार! आणि हे जर करणार नसेल तर निवडणुका घेऊन दाखवाच! मग बघतो मी काय करायचे ते! राज ठाकरे यांच्या मनसे मध्ये असलेल्या आक्रमक कार्यकर्त्यांची फळी पाहता निवडणुकीच्या कालावधीत काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही.
नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी एक कोटी सात लाख मतदारांची संख्या आणि १३ हजार ३५५ मतदान केंद्राची संख्या पाहता कुठे कुठे पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. किंबहुना प्रत्येक मतदान केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप येईल. अशा वातावरणात केवळ जबरदस्तीने निवडणुका घेणे हे महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद ठरू शकेल. म्हणूनच यावर काही ना काही तोडगा काढावाच लागेल. जर महाराष्ट्रात राज ठाकरे यांचे नेतृत्व भाजपाला उभे करायचे असेल तर कोणताही तोडगा न काढता निवडणुका घेतल्या जातील आणि राज यांच्या मनसेला EVM मशिन्स तोडण्याची संधी दिली जाईल. या कार्यक्रमानंतरच निवडणुका पुढे ढकलल्या जातील आणि महाराष्ट्रात राज ठाकरे यांचे नेतृत्व नव्या दमाने उभे राहिले जाईल.
राज ठाकरे यांना जास्त विरोध होता तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच तोच अडथळा आधीच देवेंद्र फडणवीस यांनी दूर केला. हिंदी सक्तीच्या विषयावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले. या दोघांना एकत्रित आणण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनीच केले असे खुद्द राज ठाकरे यांनी वरळी डोम येथील व्यासपीठावर जाहीररित्या सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचा पहिला भाग तिथे यशस्वी झाला. आता दुसरा भाग दुबार मतदार यादीच्या निमित्ताने सुरु झाला आहे. आंदोलन जरी विरोधकांनी केले असले तरी अग्रस्थानी राज ठाकरेच दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणे ही फडणवीसांची गरज आहे. कारण उद्धव यांच्या साथीने मृत काँग्रेस महाराष्ट्रात पुन्हा जिवंत झालेली आहे.
हे निश्चितच फडणवीस आणि भाजपाला परवडणारे नाही. पण शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्लीच्या इशाऱ्याने निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे कडून हिसकावून घेतल्याने उद्धव आणि शिवसेना महाराष्ट्रातील मराठी माणसे प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांना साथ मिळणे तितकेसे शक्य नाही आणि ज्या एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना बहाल केली ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रात तितकासा दबदबा नाही. या साऱ्या राजकारणात फडणवीस अडकले गेलेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज ठाकरे यांचे नेतृत्व मोठे करण्याचा प्रयत्न सुरु झालेला आहे. उद्धव आणि राज यांना एकत्रित आणून पहिली पायरी यशस्वी झालेली आहे. यामुळे फडणवीस यांनी एका दगडाट दोन पक्षी मारले आहे.
काँग्रेस यांना झटका दिलाच पण सर्वात मोठा झटका वारंवार दिल्लीत जाऊन मुख्यमंत्रीपद मागणाऱ्या एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. फडणवीस यांनी राज यांचे नेतृत्व मोठे करण्यात काहीच चुकीचे नाही महाराष्ट्रात प्रथमच हे घडत आहे अशातलाही भाग नाही. यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठे केल्याचे ऐकीवात आहे. म्हणूनच बाळासाहेबांच्या शिवसेनेला 'वसंतसेना' असेही बोलले जात होते. याच बाळासाहेबांच्या ताकतीवर वसंतराव नाईक यांनी दिल्लीश्वरांवर कायम दबाव ठेवला होता. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होणार का हे नगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्ताने दिसून येईल.
सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक,
संपादक, 'वृत्तमानस' मुंबई
रविवार दि. 09 नोव्हेंबर २०२५
दूरध्वनी : 8928055927.



Comments