top of page

दुब्याच्या उलट्या बोंबा...

ree

आज सकाळी सकाळी भाजपचे झारखंडमधील एक खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीद्रोहाची बोंब मारली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकीवर प्रहार करतानाच समस्त मराठीजनांवरही जोरदार टीका केली. राजकारणात असे दावे-प्रतिदावे होतच असतात. पण आजची या झारखंडी दुब्याची बोंब मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारी व मराठी माणसाला विचार करायला लावणारी आहे. त्यात मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा संदर्भ होता. उत्तरेत आल्यावर मराठी माणसांना आपटून मारण्याची विखारी भाषाही होती.

 

मराठीपणाच्या वादाचा तपशील जाणून घ्यायचा असेल, तर आपल्याला ६०-७० वर्षे आधी इतिहासात जावं लागतं. स्वातंत्र्यानंतर देशाची भाषावर प्रांतरचना झाली असली तरी मराठी माणसांना महाराष्ट्र (तोही अखंड नाही... बेळगाव, कारवारसारखा २० लाख लोकसंंख्येचा सीमाभाग अजूनही महाराष्ट्राबाहेरच आहे.) चार वर्ष उशीरा म्हणजे १९६० ला मिळाला. त्यावेळी मुंबई मिळाली असली तरी बेळगावसारखा समृद्ध भाग आपल्याला आजतागायत घेता आला नाही. त्यावेळी अण्णासाहेब डांगे, एस.एम.जोशी, प्रबाेधनकार ठाकरे, प्र.के.अत्रे यांच्यासारखे नेते व त्यावेळच्या लढवय्या मराठी माणसांमुळे मुंबई आपल्या हाती लागली.

 

तसं बघितलं तर महाराष्ट्र हा प्रांत म्हटला तर उत्तेरत म्हटला तर दक्षिणेत आणि म्हटला तर दोन्ही भागांत नाही. मराठी भाषेची लिपी देवनागरी असल्यामुळे आपल्याला हिंदी जवळची वाटते. तर पुरोगामी, प्रागतिक विचारसरणी, विज्ञानवादी दृष्टीकोन आणि काहीशा आधुनिकतेमुळे महाराष्ट्रीयन लोकांचा कल काहीअंशी दक्षिणेकडेही आहे. मराठी हा शब्द मूळ ‘मरहठ्ठा’ या शब्दावरुन आल्याचं बोललं जातं. अशा उत्तर की दक्षिण या द्वंद्वात मराठी माणूस कायमच अडकला. याचा त्याला कधी फायदा झाला तर कधी नुकसान.

 

हिंदी सक्तीचा विषय...

 

आता विषय आलाय पहिलीपासून केल्या जाणाऱ्या हिंदी भाषेच्या सक्तीवरुन... याविषयाच्या या भागाची सुरुवात चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंची एक ‘अचानक’ मुलाखत घेतली, तिथपासून झाली. त्यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं, महाराष्ट्रासमोर आमच्या भावांमधला वाद किरकोळ आहे. त्यावर ठाकरसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लागलीच अनुकूल प्रतिक्रिया दिली आणि हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. पण त्यावेळी हे दोघे कोणत्या मुद्यावर एकत्र येणार हे मात्र ठरलेलं नव्हतं. त्यानंतर अचानक  हा इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा जीआर सत्ताधाऱ्यांकडून काढला गेला आणि त्याची परिणीती दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यात झाली. आता यामागे महाराष्ट्राचे सध्याचे सर्वशक्तिमान नेते देवेंद्र फडणवीसच असल्याचे दबक्या आवाजात बोललं जात असून फडणवीसांनी दोन भावांना एकत्र आणून एका दगडात एकदोन नव्हे तर पाच ते सहा पक्षी मारल्याचेही बोलले जात आहे.

 

महाराष्ट्राचं ‘पॉवर पॉलिटिक्स’ उत्तरेच्या अवाक्याबाहेर

 

दक्षिणेत असो वा उत्तरेत असोे, तिथे टोकाचं आणि जीवघेणं राजकारण आहे. द्रमूकचे आणि अण्णाद्रमूकचे खासदार एकमेकांशी साधं बोलतही नाहीत. तसंच उत्तरेत सपा आणि बसपाच्या खासदारांच्याबाबतीत आहे. पण महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच वेगळं राहीलं आहे. इथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असले तरी त्यांचे राजकारणाबाहेर अगदी घरोब्याचे संबंध होते. आजच्या राजकारणातही मुख्यमंत्री फडणवीस व शरद पवारांचे आपसात कितीही राजकीय वैर असले तरी ते दोघेही एकमेकांचा मनापासून सन्मान करतात. आजही बऱ्यापैकी तसंच वातावरण महाराष्ट्रात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार एकेकाळी जसं राजकारण खेळायचे तशाच प्रकारचं राजकारण  जास्त ‘अँडव्हान्स’ पद्धतीने आज देवेंद्र फडणवीस करतात. त्यामुळे फडणवीस असो वा राज ठाकरे, ते उद्धव ठाकरेंच्या कितीही विरोधात गेले तरी त्यांची आतून युतीदेखील कधीही होऊ शकते. त्याचाच दुसरा भाग असा आहे की, इथे थेट लढाई नसून कायम 'शीतयुद्ध' चालू असतं. त्यामुळे या सगळ्याचं ‘गणित’ उत्तरेतील नेत्यांना कधीच कळणार नाही.

 

महाराष्ट्र देशाला दिशा देणारी भूमी!

 

महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून ही देशाला दिशा देणारी भूमी आहे. इथे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा पाया घातला. महात्मा फुले यांनी शिक्षणातून समाजाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचं संविधान दिलं. राजर्षी शाहूंनी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली. लोकमान्य टिळकांच्या प्रखर देशभक्तीने स्वातंत्र्यसंग्रामाचं यद्यकुंड पेटविलं. उद्योगापासून साहित्यापर्यंत आणि सांस्कृतिक वारशापासून सामाजिक सुधारणांपर्यंत महाराष्ट्राने नेहमीच देशाला देशा दिली आहे.

 

बात निकलेगी, तो फिर दूर तलक जाएगी

 

आता या निशिकांत दुब्याच्या वक्तव्यावरून विषय निघालाच आहे तर सर्वाचा हिशेब मांडायलाच हवा. आताचा ताजा आकडी हिशोब करायचा झाला तर जून 2025 मध्ये देशाच्या एकूण 1.84 लाख कोटी जीएसटी संकलनापैकी तब्बल 30,553 कोटी रुपये म्हणजे जवळपास 17 टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून मिळाल्याचे दिसते. त्याखालोखाल कर्नाटक (13,409), गुजरात (11,040) आणि तामिळनाडूचा (10,676) क्रमांक लागतो. यात कुठेही गायपट्ट्यातील कुठलेही बिमारू राज्य येत नाही. हा झाला आर्थिक हिशोब. बाकी सामाजिक, राजकीय लेखाजोखा करायचा झाला तर पुरवण्या कमी पडतील...

 

दुबे जातीयवादी...

 

या दुबे महाशयांनी मराठी माणसांवर व महाराष्ट्रावर गरळ ओकून झाल्यावर आपल्या विधानांचा शेवट करताना महाराष्ट्रातील काही महापुरुषांची आदराने नावे घेतली. मात्र त्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कटाक्षाने टाळले. त्यांनी सात ते आठ नावे घेतली पण त्यात जाणीवपूर्वक आंबेडकरांचा उल्लेख टाळला. म्हणजे आंबेडकरांनी केलेलं अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य या महोदयांना सलत असावं.

 

फोडा आणि राज्य करा...

 

कालच भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच दिलं जावं, असं ठासून सांगण्यात आलं. दुसरीकडे भाजपचाच झारखंडी खासदार दुबे यांनी जहाल वक्तव्य करून भाषिक तणावात भर टाकली. हेच पेटवणार... हेच विझवणार... अशातला हा प्रकार! अलिकडे समाजमाध्यमांमुळे राजकारणातले हे जीवघेणे खेळ लोकांनाही हळूहळू कळू लागले आहेत. असं वारंवार होत राहिलं तर एक दिवस या सर्वाचा भडका उडण्याची शक्यता उरतेच.

 

गुन्हेगारीत गायपट्टा कायम अग्रभागीच...

 

उत्तरेतील गुन्हेगारीवर लिहायचं झालं तर वेळ कमी पडेल. पण कालचाच विषय घ्यायचा झाला तर बिहारच्या पुर्णियामध्ये चेटकीण म्हणून एका कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली. तसंच बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वीच मोठे उद्योजक आणि भाजप नेते गोपाल खेमका यांची हत्या करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचीही हत्या करण्यात आली होती. असे आदिम आणि भीषण प्रकार महाराष्ट्रात फारसे घडत नाहीत. गुन्हेगारी अलिकडे सगळीकडे वाढली असली तरी महाराष्ट्राच्या तुलनेत गायपट्टा यात कितीतरी पुढे आहे.

 

भिक्षुकितही आता पांडे, शर्मा, दुबे, गुप्ता, मिश्रा...

 

गेल्या काही वर्षांपासून मुंबईच नाही तर महाराष्ट्रातही छोट्या-छोट्या व्यवसायांमध्ये अमराठी भाषिक बहुसंख्येने दिसत आहेत. मराठी माणसाचा पिंड व्यापाराचा नसल्याने आधीच गुजराती, मारवाडी, सिंधी भाषिक इथे व्यावसायिक नफ्यातून बऱ्यापैकी सधन झालेत. आता छोट्या धंद्यांमध्येही युपी -बिहारींचा भरणा आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात तर अगदी भिक्षुकितही आता पांडे, शर्मा, दुबे, गुप्ता, मिश्रा दिसायला लागले आहेत.

 

मराठी माणसांनीही आत्मपरीक्षण करावं!

 

मुळात सामान्य मराठी माणसांना हिंदीचं आकर्षण आहे. इंग्लिश किंवा दुसरी द्राविडी भाषा जमत नसल्यामुळे असेल कदाचित आपल्याला देवनागरी लिपीतील हिंदी जवळची वाटत असावी. (तसं आता आपल्यालाही इंग्लिशही बऱ्यापैकी जमतंय, तो भाग वेगळा.) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर खानदेश मराठवाडा आणि विदर्भात दररोजच्या मराठी बोलीभाषेत कितीतरी हिंदी शब्दांचा वापर सर्रासपणे केला जातो नागपुरी पट्ट्यात तर अट्टाहासाने हिंदी बोलली जाते याचा याचाही विचार आपण कधीतरी केला पाहिजे.

 

मराठवाडा - विदर्भ आणि खानदेशात सहज वापरले जाणारे शब्द...

 

तास- घंटा

आलं - अद्रक

मांजर - बिल्ली 

बटाटा - आलू 

भाई - भैय्या 

ताई - दिदी 

आपटणे - पटकणे 

जीव - जान 

मासे - मच्छी 

भटजी - पंडित 

द्राक्ष - अंगुर 

लोणचं - आचार

 

ree

                                         

Comments


bottom of page