नव्या द्रुतगती महामार्गावर इको कार दुभाजकावर आदळली; चालकाचा मृत्यू, पाच जखमी
- Navnath Yewale
- Sep 4
- 1 min read

डहाणू: तालुक्यातील गंजाड येथे सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात इको कार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच प्रवासी जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले चालकाचे नाव बच्चू बाबू मासमार (रा. चरी कोटबी) असे आहे.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई–वडोदरा नव्या द्रुतगती महामार्गावर गाडी क्रमांक MH.46X9428 भरधाव वेगाने जात असताना अचानक लोखंडी दुभाजकावर आदळली. अपघातात गाडीतील सहा प्रवाशांपैकी महेंद्र सुभाष आहडी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित चौघांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, डहाणू येथे प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.
हे सर्वजण चरी कोटबी गावातील रहिवासी असून, ते घरी परतत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, मुंबई–वडोदरा नव्या द्रुतगती महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाही या मार्गावरून वाहने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.



Comments