top of page

ना. अजित पवारांचा शेतकर्‍यांसाठी महत्वाचा निर्णय!


रात्रीच्या विज पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांवर अनेक वेळा वन्यजिवांचे हल्ले झाले आहेत.शिवाय अनेक शेतकर्‍यांच्य जीवावर बेतले आहे. भारनियमनाच्या विळख्याने उत्पादन संरक्षणासह शेती उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच आनेक शेतकर्‍यांना जीव धोक्यात घालून रात्रीच्या विजपुरवठ्यामुळे शेती पिकांना पाणी सोडण्यासाठी बांधावर रात्र जागून काढावी लागते.त्यातच भक्ष्याच्या शोधात बाहेर पडणार्‍या हिंस्त्र वन्यजिवांचा शेतकर्‍यांवर हल्ल्याच्या आनेक घटना घडल्या आहेत. पण आता शेतकर्‍यांना दिवसाचा पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


आता राज्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी वीज फक्त दिवसा मिळणार असून रात्री वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ही महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘संवाद-उद्योजकांशी’ या कार्यक्रमात केली आहे. अजित पवार म्हणाले की, “ आत्तापर्यंत आठवड्याचे काही दिवस दिवसा, काही दिवस रात्री वीज दिली जात होती.



पण शेतकर्‍यांना वन्यप्राण्यांचा धोका असून, रात्री शेतात जाणं जीवावर बेततं. त्यामुळे आता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वीज दिली जाईल आणि रात्री वीजपुरवठा बंद राहील. यामुळे शेतकरी रात्री घरात सुरक्षित झोपू शकतील.” राज्यात बिबटे, रानगवे, रानडुकर यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. रात्री वीजपुरवठा असल्याने शेतकर्‍यांना पाण्यासाठी शेतात जावं लागतं आणि त्यामुळे जीवाची जोखीम वाढते.


शेतकर्‍यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दिवसा 12 तास अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू असली तरी, वीज पुरवठा प्रामुख्याने रात्री होत असल्याने शेतकर्‍यांना अपेक्षित लाभ मिळत नव्हता. या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे जीवन सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

या निर्णयामुळे राज्यात नवीन वीज वितरण आराखडा तयार केला जाण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपन्यांना दिवसा वीज देण्यासाठी स्मार्ट लोड मॅनेजमेंट करावं लागणार असून, उत्पन्न आणि मागणी यामध्ये संतुलन साधणं हे मोठं आव्हान असेल. या निर्णयामुळे शेतकर्‍यांचा दैनंदिन धोका कमी होईल आणि शेतीची उत्पादकता व सुरक्षितता वाढेल, असी सर्वसामान्यांतून भावना व्यक्त होत आहेत.

Comments


bottom of page