top of page

संसदेत विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी घातला पंतप्रधानांच्या आसनाला घेराव, भाजपकडून पंतप्रधानांवर हल्ल्याचा आरोप; 22 वर्षात पहिल्यांदाच...

नवी दिल्ली: लोकसभेत आज (बुधवार 4 फेब्रूवारी 2026) संसदेच्या इतिहासातील एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार घडला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येणार होते. मात्र त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव घातल्याने मोठी खळबळ उडाली.

या गोंधळामुळे अखेर पंतप्रधानांचे भाषण रद्द करावे लागले आणि सभागृहाचे कामकाज तहकुब झाले. या संपूर्ण राड्याची सुरुवात बुधवारी सकाळपासून झाली होती. ज्यामागे अनेक राजकीय कारणे दडली आहेत.


सभागृहातील सघर्षाची सुरुवात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही भाग वाचण्यापासून रोखण्यात आल्यानंतर झाली. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत होत होते. मंगळवारीच विरोधी पक्षाच्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुूळे विरोधकांचा राग अनावर झाला होता. त्यांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली होती.


बुधवारी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा सभागृह पुन्हा सुरू झाले, तेव्हा सर्वांचे लक्ष पंतप्रधानांच्या भाषणाकडे होते. मात्र, पंतप्रधान मोदी सभागृहात येण्यापूर्वीच वर्षा गायकवाड आणि जोतीमणी यांच्यासह विरोधी पक्षाच्या महिला खरासदारांनी थेट पंतप्रधानांच्या आसनाकडे धाव घेतली. या खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला चारही बाजूंनी वेढले आणि तिथेच ठिय्या मांडला. त्यांच्या हाता एक मोठा बॅनर होता, ज्यावर योग्य तेच करा असा संदेश लिहिलेला होता. खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी हा आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. ज्यामुळे सत्ताधारी बाकांवरील नेतेही आवक झाले.


चीन सीमावाद आणि भाषण रद्द : दुपारी जेव्हा कामकाज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा विरोधकांनी 2020 मधील चीनसोबतच्या सीमावादाचा मुद्द उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. एका बाजूला खासदारांचे निलंब आणि दुसर्‍या बाजूला सीमावाद या दुहेरी कोंडीमुळे सभागृहात कामकाज होणे अशक्य झाले. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण रद्द करण्यात आले आभार प्रदर्शन प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. आता गुरुवारी पुन्हा या विषयावर चर्चा होण्याची शक्यता असून संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभेच्या पुढील कामकाजाकडे लागले आहे.

महिला खासदारांचा ढाल म्हणून वापर केल्याचा आरोप : लोकसभा सचिवालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या 22 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणातवरील आभार प्रस्तावावर भाषण केले नाही. काँग्रेस पक्ष लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शारिरीक हल्ला करण्याचा प्रयत्न करणार होता, तशी योजना तयार केली जात होती. त्यासाठी महिला खासदारांना ढाल म्हणून पुढे पाठवण्यात आले होते, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर कोणतेही भाषण केले नाही. त्यानंतर सभागृहातील गोंधळ लक्षात घेता लोकसभेच्या अध्यक्षांनी कामकाज स्थगित केले.


मोदी एपस्टीन फाईल्सला घाबरले आहेत का? : दुसरीकडे काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळला आहे. आम्ही फक्त बॅनर घेऊन गेला होतो. भाजपकडून खोटा दावा केला जात आहे, असे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसेच मोदी एपस्टीन फाईल्सला घाबरले आहेत का? असा सवालही त्यांनी केला. त्यामुुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments


bottom of page