top of page

पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची प्रकृती खालावली; आंदोलनस्थळावर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा ठिय्या

पुणे : आदिवासी शासकीय वसतिगृहामध्ये मुलभूत सुविधांचा अभाव आणि शासन निर्णयातील जाचक अटींविरोधात पुण्यातील मांजरी येथे गेल्या दहा दिवसांपासून 6 विद्यार्थ्यांचे (4 मुलं आणि 2 मुली) बेमुदत उपोषण सुरू आहे. सलग 10 दिवस चालेल्या उपोषणामुळे विद्यावर्थ्यांची प्रकृती कमालीची खालावली असून यातील काही जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनास राहुल गांधी, आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला असून राहूल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.


आदिवासी वसतिगृहता पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह आणि दर्जेदार भोजनासारख्या मूलभूत सुविधांचा तीव्र तुटवडा आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाबाबत नुकताच एक नवीन जीआर जारी केला आहे. या नवीन नियमावलीतील काही तरतुदींना विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. विशेषत: या जीआरमध्ये समाविष्ट केलेली‘ वयाची अट’ रद्द करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. या अटीमुळे अनेेक गरजू आणि ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.


दरम्यान, गेल्या 10 दिवसांपासून हे विद्यार्थी आपल्या हक्कासाठी उपोषणाला बसले आहेत. परंतु प्रशासनाकडून आणि आदिवासी विकास विभागाकडून अद्याप कोणतीही सकारात्मक दखल घेण्यात आलेली नाही. “ शासकिय अधिकारी आमच्या आरोग्याशी आणि भविष्याशी खेळत आहेत, आमचा जीव गेला तरी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणारनाही.” अशी ठाम भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.


सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, इतर विद्यार्थी वसतिगृह आवारातच आंदोलन चालू ठेवून आहेत. शासनाने तात्काह हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली जात आहे.


आमदार रोहित पवार यांचा सरकारला इशारा : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे. सरकारने तात्काळ या आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा लवकरच आम्ही नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन उभा करू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.


राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र: काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नुकताच पुण्यात ‘छात्रो की गूंज’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आदिवासी विद्यार्थी आंदोलनातील एका विद्यार्थीनीने राहुल गांधी यांच्या स्टेजरून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडत राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. राहुल गांधींनी या आंदोलनास भेट द्यावी अशी मागणीही तिने यावेळी केली. राहुल गांधी यांनी विद्यार्थीनीच्या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

Comments


bottom of page