top of page

बीडमध्ये पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बीड: बीडमध्ये 174 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. सोळाशे मिटर धावण्याच्या चाचणी दरम्यान बुधवारी (दि.11) दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक भास्कर वाव्हळ रा. मांडेखेले, ता. परळी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुळचा मांडेखेल येथील रहीवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलिस भरतीसाठी दाखल झाला होता. भरती दरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकिय तपासणी सुरू असतानाच अचानक मैदानावर भोवळ येऊन कोसळला त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. डीहायड्रेशन मुळे हार्ट अटॅक आला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.


दीपकचे आई- वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मयत युवक दीपक पुण्याला काम करत होता. मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे येऊन पोलीस भरतीची तयारी करत होता.


त्याचा एक लहान भाऊ असुन तो ऑटो रिक्षा चालवतो. ऊसतोड मजूर असलेल्या या कुटुंबाचा आधार होण्याची धडपड करणार्‍या या युवकावर नियतीने अशा पद्धतीने घाला घातल्याने मांडेखेल गावात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांडेखेल व परळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Comments


bottom of page