बुलढाण्यात पुतळ्याचा वाद चिघळला; चिखला गावच्या सरपंचासह 23 जणांना अटक , गावात तणावपूर्ण शांतता, संचारबंदी लागू
- Navnath Yewale
- Feb 23
- 2 min read

बुलढाणा: जिल्ह्यातील चिखला काकड (ता.लोणार) गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन सुरू झालेला वाद आता चिघळला असून गावात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. विनापरवानगी पुतळा उभा करणे, त्यावर प्रशासनाची कारवाई आणि त्यानंतर झालेली हाणामारी यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कलम 163 म्हणजेच संचाबंदी लागू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक केली असून 38 हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चिखला येथे दि.4 फेब्रूवारी रोजी मध्यरात्री अंगणवाडी परिसरात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला. मात्र या स्थापनेसाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी घेण्यात आली नव्हती, असा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर 11 फेब्रूवारी रोजी तहसील कार्यालयाने पुतळा हटवण्याचे आदेश दिले. दरम्यान 21 फेब्रूवारीच्या मध्यरात्री काही शिवप्रेमींनी पुन्हा एकदा अश्वारुढ पुतळा तिथे बसवला. प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता ही स्थापना करण्यात आल्याने गावात दोन्ही गट आमनेसामने आले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वातावरण अधिकच तणापूर्ण बनले.
या संघर्षादरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हाध्यक्ष संजीवनी वाघ यांच्यावर कथित हल्ला झाल्याची घटना समोर आली. यावेळी संजीवनी वाघ यांचे कपडे फाटलेल्या अवस्थेतील व्हिडियो सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. शिवाय एका दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण, तीन वर्षाच्या मुलीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही संजीवनी वाघ गटाकडून करण्यात आला. पुतळा हटवण्याच्या प्रक्रियेला विरोध करत असताना काही समाजकंटकांनी त्यांना मारहान केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेत असतील वर्तन झाल्याचा देखील दावा केला जात आहे. या घटनेचा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी नगारिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. गावचे सरपंच गणेश काकड यांना वाशीम जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं असून आतपर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटले असून शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री दिपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील काही नेत्यांकडून विशिष्ट समाजाबद्दल द्वेष पसरवला जात असल्याचा अरोप त्यांनी केला आहे. तर दिुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला 24 फेब्रूवारीपर्यंत दोषींवर कठोर कारवाईचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ आणि वस्तुस्थिती मांडण्यासाठी वंजारी समाजातर्फे गावात सत्य कथन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. केवळ दोषींवरच कारवाई व्हावी आणि निष्पाप नागरिकांना त्रास होऊ नये, अशी मागणी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास अधिकृत परवानगी दिली जाणार का? गावातील तणाव कधी निवळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



Comments