मराठा आंदोलकांचा खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read
तुम्ही चुटकीत, हा प्रश्न सोडवू शकता, खासदार सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर सडकून टीका

मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस, आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.त्यामुळे सरकारवचा दबाव वाढत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमिवर अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेत आहेत. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात काही वेळ चर्चा देखील झाली. यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी याकडे आधी लक्ष द्यावं आणि निर्णय घ्यावा. तुम्ही आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली आणि सत्ता स्थापन केली, मुख्यमंत्री बनले ना? मग आता सत्तेत आहात. सरकार तुमचं आहे आणि निर्णयही तुम्हालाच घ्यायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही आम्हाला काय विचारताय? आमच्यावर का टाकताय? याचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे. हे विरोधकांवर टाकू नका,असे म्हणत खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला.
खासदार, सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की,लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलवा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, सगळ्या पक्षांनी मिळून एकत्र यावर मार्ग काढू. अशी मागणीही सुळे यांनी केली. नुसत्या गाड्यांमध्ये फिरून आणि प्रायव्हेट विमानात फिरून सत्ता चालवता येत नाही. मायबाप जनतेचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत.
विखे पाटील हे पवार साहेबांबद्दल बोलत आहेत ते किती वर्षे सत्तेत काँग्रेसमध्ये होते? तुमच्याकडे अडीचशे आमदार आहेत ना. तुम्ही चुटकीत हा प्रश्न सोडवू शकतात. हे दुर्दैव आहे की, तीन दिवस झाले आंदोलन सुरू आहे. सरकारमधून एकही प्रतिनिधी इथे चर्चा करायला आला नाही, असा हल्लाबोल सुळे यांनी केला.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे या आझाद मैदानावरून निघत असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याचा प्रकार घडला. यावेळी सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालत ‘शरद पवार यांनी मरठा आरक्षणाचं वाटोळं केलं’ असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.
Comments