मराठी माणसाला ‘ पटक-पटक कर मारेंगे’ म्हणणार्या खासदाराला पुण्यात व्हीआयपी सेवा
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read
सामान्य भाविकांसाठी महाशिवारात्रीला बंद असलेले भीमाशंकर दर्शन, वादग्रस्त खासदारासाठी खुले केले; प्रशासनाविरोधात भाविकांतून तीव्र संताप

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे गेले अडिच महिन्यांपासून सर्व सामान्य भाविकांसाठी बंद असताना झरखंड राज्यातील खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने भाविकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे दर्शन आज (दि.14) दुपारी 2:00 च्या दरम्यान घेण्यात आले. महाशिवरात्रीलाही येथे दर्शनासाठी मंदिर बंद असल्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांनी स्वीकारला हाूेता. परंतु या आगळ्यावेगळ्या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक प्रशासनाविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. महादोवाच्या मंदिरामध्ये असा दुजाभाव का असा प्रश्न भाविकांतून उपस्थित केला जात आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम सुरू आहे. भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्याबरोबरच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंदिर हे 9 जानेवारी 2026 पासून तीन महितन्यांसाठी जिल्हाधिकारी यसांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला स्थानिक नगरिक, भाविक व सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी संमती दिली होती.
दरम्यान, गेल्या अडिच महिन्यापासून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तप अनुष्ठाने करून हजारो किलोमिटर पायी वारी तसेच सायकलवारी करत येणार्या भाविकांना सुद्धा दर्शन घेऊ दिले जात नाही. हजारो किलोमिटर येऊनही त्यांना दर्शन न घेता परतावे लागत असताना मात्र हेलिकॉप्टरने आज आलेले खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना व्हीआयपी सेवा पुरवत यांच्यासाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन दिले.
खासदार डॉ. निशिकांत दुबे हे झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते निकटवर्तीय म्हणजे मानले जातात. खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. पवित्र अशा महाशिवरात्रीला आठ दिवस मंदिर खुले करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र या मंदिर परिसरामध्ये चालू असलेल्या कामांमुळे पवित्र अशा महाशिवरात्रीच्या दिवशीही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. हा निर्णय सर्वसामन्य भाविक भक्तांनी ही मोठ्या मनाने स्वीकारला होता.
मात्र एका व्हीआयपी नेत्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या व्हिआयपी दर्शनाची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. प्रशासनाने दर्शनासाठी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती
दरम्यान, निशिकांत दुबे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये शाब्दिक युद्ध सुरू होते. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होणार्या हल्ल्यांचा निषेध दुबे यांनी केला होता. दुबे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर “ हम मराठी लोगों को यहा पर पटक-पटक कर मारेंगे” असं वादग्रस्त विधानही दुबे यांनी केले होते.



Comments