top of page

जरांगे पाटलांचा एल्गार रणरणत्या उन्हात उपोषण, बस्स.. आता आरपारची लढाई, 30 मे पासून आंतरवली सराटीत उपोषण; उष्माघाताने मेलो तर मुख्यमंत्री जबाबदार - जरांगे पाटील

जालना: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाना साधत आरक्षणाच्या मुद्यावर वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर शनिवार दि. 30 मे पासून आतापर्यंत देशात कधीही झाले नसेल असे कठोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिष्ठमंडळाकडून आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. चर्चेदरम्यान मागण्यांच्या पुर्ततेसाठी सरकारला 29 मे चा अल्टीमेटम देण्यात आला होता. अवघ्या काही तासात अल्टीमेटम संपत असला तरी अद्याप सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे.


सरकारला दिलेल्या कालावधीची वेळ संपत आल्याने मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दि.28 आंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेत कठोर उपोषणाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळवून देण्यासाठी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. दरवेळचं उपोषण सावलीत होते मात्र यावेळचं उपोषण अत्यंत .कठोर होणार आहे. देशात असं उपोषण झालं नसेल असं उपोषण करणार आहे. मंडप टाकणार नाही,सावलीत बसणार नाही. थेट रणरणत्या उन्हात बसणार आहे. मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाबाबदार असतील असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शनिवार दि.30 मे पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.


पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या समाजातील लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला आहे, तर मी माझी कदर का करू? आता केवळ चर्चा नको तर थेट अंमलबजावणी हवी अशी ठाम भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाचे स्वरुप बदलल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की सरकारपला 10 महिने वेळ दिला. आता माझा नाईलाज आहे,, मला कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या लेकरांना, समाजाला मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. शनिवारी दि.30 मे रोजी सुरू होणारं अमरण उपोषण आतापर्यंतचं सर्वात वेगळं असणार आहे. नेहमीची उपोषणे ही सावलीत, मंडपात किंवा फॅनखाली केली जातात. पण मला आता अंतिम आणि टोकाचे उपोषण करायचे आहे. मे महिन्याच्या या रणरणत्या उन्हात एक साधी बाज टाकून उघड्यावर बसणार आहे. यात ना कुठे अन्न असेल, ना पाणी आणि मी पायात चप्पलही घालणार नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.


तीन वर्षापासून आंदोलन सुरू असताना सरकार चर्चेसाठी सतत वेळ मागत आहे. आता थांबता येणार नाही उष्माघाताने बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला.


कुणबी मराठा मंत्रालया स्थापन करा- जरांगे पाटील: माझ्या समाजाच्या लेकरांचा उन्हाळा होतोय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आमरण उपोषण सुरू असताना मराठा समाजाने आंतरवालीकडे येवू नये, असंही मनेाज जरांगे पाटील यांनी आवाहन केले. प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील हे येणार की नाही हे मला माहिती नाही. 29 ऑगस्ट पासून उद्यापर्यंत सरकारला 10 महिन्याचा वेळ दिला आहे. हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला त्यानुसार तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का? व्हॅलिडिटी देणार आहात का? हें सरकारने एकदा स्पष्ट करावं. सातारा गैझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला,10 महिने जीआर काढत नाहीत. अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Comments


bottom of page