मराठ्यांच ठरलं, या तारखेला मुंबईला धडक !
- Navnath Yewale
- Apr 30, 2025
- 2 min read
मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; खुनशी वागू नका, गर्वात राहू नका सरकारला इशारा

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली (सराटी) येथे पत्रकार परिषदेद्वारे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहिर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबईला धडक देऊन आमरण उपोषणाला सुरवात करणार असल्याचा मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या म्हणायचं कारणच नाही येत, आता आपल्याला मुंबई सोडायचा प्रश्नच येत नाही. आंदोलनाची पुढील टप्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहित आहे मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचं उचलतोय. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार, तुम्ही सगळ्यांनी फक्त मला मुंबईला सोडायला आले तरी बास.
दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत. मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं. आज तीन महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकरांच्या अडीअडचणी बघाव्या लागतात. संयम तरी किती दिवस धरायचा, 29 ऑगस्ट 2025 ला आम्ही मुंबईत जाणार आहोत. मुंंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे. मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर कामं आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही, सगे सोेयर्याच्या अधिसूचनेला दिड वर्ष पूर्ण झालं आहे. पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार आहे. सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे पाटील म्हणाले की, हक्काचं आहे ते आम्हाला द्या कोणी विरोध केला तरी ते आमच्या हक्काचं आहे, ते आम्हाला द्या ते रोखू नका. आझाद मैदानावर किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे, या दोन ठिकाणावरती उपोषण करणार आहे. शांततेत उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. समाजाला सांगतो तुम्ही रुसू नका. मी उपोषण केलं की, तुम्ही रुसता. तुम्ही रुसायचं नाही तुम्ही ताकतीने माझ्यासोबत आलं पाहिजे.
तुमच्या मुलांसाठी मी हे करतोय. आपल्या लेकरा बाळांचं चांगलं झालं पाहिजे. कडवट वागायचं, धाडशी वागायचं असंही ते पुढे म्हणाले. एक ऑगस्टला आंदोलनाची पुढील दिशा आणि मार्ग सांगणार आहोत. आजपासून तयारी सुरू करण्यात आलेली आहे. चलो मुंबई मला फक्त 28 तारखेला मुंबईत नेऊन सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनीच मला सोडायला या मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळांसाठी लढायला. माझा समाज माझ्या मागे आहे. सात कोटी मराठा माझ्यासोबत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा दिला आहे. फडणवीस साहेब सत्ता जात असते, माणसाच्या डोक्यात एकदा खुन्नस बसली तर सत्ता बदलल्यावर लोक बदले घेत असतात. फडणवीस साहेब तुम्ही खुनशीपणाने वागू नका, गर्वात राहू नका. तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं, काँग्रेसची सत्ता पलटेल, काँग्रेसने 40 ते 50 वर्ष राज्य केलं. तुमची सत्ता आली तसं तुमची सुद्धा पलटत असते, गर्वाने वागू नका. तुम्ही गॅझेटीयर, केसेस आणि मराठा आणि कुणबी एक आहेत याचे अध्यादेश तातडीने काढा. नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरवात करा, असा इशारा वजा सल्ला मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.



Comments