मुंबईत 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले, 34 वाहनांमध्ये 400 किलो आरडीएक्स; वाहतूक पोलिसांना मिळालेल्या मॅसेजमुळे खळबळ
- Navnath Yewale
- Sep 5, 2025
- 2 min read

राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच सार्वजनिक गणपती विसर्जनापूर्वी मुंबई पोलिसांना धमकीचा मॅसेज आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्अपवर आत्मघातकी हल्ल्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई शहरात 34 वाहनांमध्ये जवळपास 400 किलो आरडिएक्स प्लांट केले असून 1 कोटीहून अधिक लोकांना मारण्याची ही योजना असल्याचं मॅसेजमध्ये उल्लेख आहे.
या मॅसेजनुसार, लष्कर ए जिहादीचे 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत असा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा मॅसेज पाठवणार्या व्यक्तीने दावा केला आहे. सप्टेंबर 3 तारखेला संध्याकाळी मुंबई वाहतूक पोलिसांच्या सोशल मिडिया व्हॉट्सअप नंबरवर हा मॅसेज आला होता. या मॅसेजची तात्काळ दखल घेत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही बाब कळवली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मॅेज पाठवणार्याची चौकशी सुरु केली आहे. या धमकीमुळे पोलिस सतर्क झाले आहेत. ठिकठिकाणी नाका तपासणी आणि कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्येही अशाच प्रकारे वरळीतील एका हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. हॉटेलच्या 3 व्हिआयपी रुममध्ये ब्लास्ट होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. जुलैमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी देणारा ईमेल यंत्रणेला मिळाला होता. या धमकीमुळे बीएसई इमारतीत काही काळ दहशतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षा जवानांनी दलाल स्ट्रीट परिसर आणि संपूर्ण दक्षिण मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली.
मुंबईत सध्या गणेशोत्सव सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गणेशभक्त विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवर चौपाटीवर गर्दी करतात. गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी मिळालेल्या या धमकीच्या मेसेजमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासोबतच धमकीचा मॅसेज पाठवणार्याचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी देणार्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता मुंबई वाहतूक पोलिसांना आलेला मॅसेजची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे.
मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त : वाहतूक पोलिसांना मॅसेज पाठवणार्याचा शोध सुरू असून गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक ठिकाणं, विसर्जन मार्ग, रेल्वे स्थानकं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ड्रोन, सीसीटीव्ही आणि अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे शहरावर करडी नजर ठेवली जात आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करत संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास 100 क्रमांकावर किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.



Comments