top of page

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला ... तर आमदारकीचा राजीनामा देईल-आमदार प्रसाद लाड

जालना: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 30 मेपासून उपोषणाला सुरुवात करणार असून अंतरवाली सराटीतच हे आमरण उपोषण होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. मात्र, त्याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळातील आमदार प्रसाद लाड यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अंतरवाली सराटीतच लाड, जरांगे यांच्यात चर्चा झाली. ‘ अनेकदा माझे आणि मनोजदादांचे वाद झाले आहेत. पण आरक्षण मिळालं ते मनोजदादांच्या आंदोलनामुळेच, फडणवीसांना दादांनी समजून घेणं गरजेचं आहे. 30 मे रोजी जरांगेंनी आंदोलन करू नये, असं आवाहन प्रसाद लाड यांनी यावेळी केलं आहे.


प्रसाद लाड म्हणाले की, ‘ एक आमदार, नेता म्हणून नाही तर सर्वसामान्य म्हणून भेटील आलो आहे. मनोज जरांगे हे समाजाचं दैवत आहेत. त्यांनी आवाहन केलं म्हणूनएक दिवस आधीच आलो. माझ्याविषयी तुमच्या मनात द्वेष असेल तर ते मला दूर करायचे आहेत. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. दादांच्या सात- आठ मागण्या मी समजून घेणार आहे. मागण्या का मान्य झाल्या नाहीत? त्या अडचणी समजून घेणार आहे. समाजाच्या अडचणी दूर झाल्या नाहीत, तर आमदारकीचा राजीनामा देणार, समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. मनोज जरांगेंचे विषय मी सरकार दरबारी मांडणार. असंही लाड यावेळी म्हणाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत सवाल केला असता ते म्हणाले की, हाकेसाहेबांना जरांगेच्यया मागण्यांवर पोटसूळ उठण्याचं कारण नाही. हाकेंनी मागण्यांबाबत गैरसमज करू नये. हाकेंनी चर्चेला बोलावलं तर त्यांच्याकडेही जाईल असं लाड यांनी स्पष्टीकरण दिलं.


आज सकाळी प्रसाद लाड यांच्या पीएच्या फोनवर एक धमकीचा फोन आला होता. याबाबतच्या प्रश्नावर प्रसाद दला म्हणाले की, मला धमकीचे फोन अनेकवर्षे येतात. मी त्यावर लक्ष देत नाही काल रामा इंटरनॅशनलमध्ये काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला. धमी देणारे मराठा समाजातले कार्यकर्ते असल्याचं समजलं. मी समाजासाठी दादांच्या आवाहनावर इथे आलो आहे. धमक्या कशाला? आणि तसंय असेल तर मी समाजासाठी मरायला तरयार आहे, असंही प्रसाद लाड म्हणाले.


दरम्यान, मी युद्ध पेटवायला आलो नाही, गीतेतला सार घेऊन आलोय, दादांचा हात माझ्या डोक्यावर राहिला तर समाजाचे प्रश्न तडीस जातील. मी आणि जरांगे भाऊ, आमच्यात भांडण लावू नका. दादांसाठी मी विविध मुद्यांचे कागदही घेऊन आलोय, विकास महामंडळाला काल दिडशे कोटींचा निधी मिळाला, अभिनंदन करायला हवं, दादांनी यापूढे उपोषण करू नये, ही माझी विनंती आहे. 30 मे या दिवशी जरांगेंनी उपोषण आंदोलन करू नये,अशी मागणीही प्रसाद लाड यांनी यावेळी केली.


दरम्यान, प्रसाद लाड यांच्याशी चर्चेनंतर जरांगे पाटील म्हणाले की, सारथी अंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या का कमी केली? 80 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का थांबवली? मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू नाही. आमच्या आईला मारलं तर आम्ही त्यांच्या आईवर बोलू नये?, असे सवाल जरांगेंनी लाड यांना विचारले. पुढे ते म्हणाले की, ‘ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाणीही दिलं नाही. फडणवीस म्हणाले माझे पोलिस आहेत, मग जनता तुमची नाही? अंतरवालीत आमच्यावर अन्याय का केला? आम्ही मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांबाबत वाईट बोललो होतो का? मालकत्व, पालकत्व स्वीकारायचं असेल तर टीकाही सहन करायला हवी. मराठ्यांनी तुमचं काय पाप केलंय? मुख्यमंत्री आमच्या जातीचा नसूनही आरक्षण दिलं. कुणी नाकारलं? असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार मनोज जरांगेंनी यावेळी केला आहे. आता याचर्चेनंतर मनोज जरांगे पाटील उपोषणाबाबत काय निर्णय घेणार यावर सर्वांच लक्ष लागून आहे.

Comments


bottom of page