मुलुंड मेट्रो ब्रिज दुर्घटना: कपनीवर गुन्हा दाखल,पाच अधिकार्यांना अटक; कंपनीला पाच कोटीचा दंड !
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 2 min read

मुंबई: मुलुंड एलबीएस मार्गावरील मेट्रो ब्रिजवरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता कारवाईला वेग आला आहे. मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हादाखल करण्यात आला आहे. तसेच प्रोजक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्यूटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. जबाबदार असलेल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजीत साळवे याला निलंबित करण्यात आलं आहे. तर तसेच मेट्रो ब्रिज मार्गाचे सेप्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत.
या अपघातास जबाबदार असलेल्या मिलन इंफ्रा कंपनीला पाच कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर दुर्घटनाग्रस्त मेट्रो मार्गाचे बांधकाम करणार्या कंपनीला कन्सल्टंट करणार्या लई बर्गर कंपनीला 1 कोटी रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. दुर्दैवी, या घटनेत मुंबई फिरण्यासाठी आलेले उत्तर प्रदेशातील रामधन यादव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील एका गावाचे सरपंच म्हणून काम पाहत होते. ते मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी आले होते. कळव्यात एका लग्नासाठी रामधन यादव आणि महेंद्र यादव रिक्षानं निघाले होते. त्याचवेळी मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळला. मुंबई फिरल्यानंतर दोन दिवसात रामधनी यादव उत्तर प्रदेशात जाणार होते. या घटनेची माहिती मिळताच रामधन यादव यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर हंबरडा फोडला.
दरम्यान, मुलुंड स्लॅब दुर्घटना प्रकरणात एमएमआरडीए कडून उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना एमएमआरडीए च्या भरपाई धोरणानुसार 15 लाख रुपये आर्थिक मतद दिली जाणार आहे. त्याचसोबत जखमींचा संपूर्ण वैद्यकिय खर्च पूर्णपणे एमएमआरडीए करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दुर्घटनांनी अनेकदा हादरलेली मुंबई पुन्हा एकदा एका अपघातानं हादरली आहे. मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तसंच तीन वाहनं स्लॅबखाली दबली गेली. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावेळी हा स्लॅब कोसळला. एलबीएस रोडवरून ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर बंद करण्यात आली होती. एमएमआरडीए या संपूर्ण मेट्रो मार्गाचं बांधकाम करत आहे. वेगवेगळ्या चार टप्प्यांमध्ये 4 वेगवेगळे कंत्राटदार आहेत. दरम्यान, या अपघातानंतर बंद करण्यात आलेला एलबीएस मार्ग तब्बल सात तासांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंड दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत आणि जखमींचा उपचार राज्य सरकार करणार असल्याची घोषणा केली आहे.



Comments