मुसळधार पावसात घर कोसळलेल्या कुटुंबाला ‘यारी दोस्ती ग्रुप’चा दिलासा
- Navnath Yewale
- Aug 25, 2025
- 1 min read

डहाणू: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आंबिस्ते गावातील रहिवासी बायजी भिवा लहागे यांचे घर जोरदार वादळी पावसात कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या घराचे छप्पर आणि भिंती कोसळून घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू – धान्य, कपडे, तांदूळ, आणि इतर साहित्य – पूर्णतः नष्ट झाले. परिणामी, लहागे कुटुंबाला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
या घटनेची माहिती मिळताच ‘यारी दोस्ती ग्रुप’ या सामाजिक संस्थेने त्वरित मदतीचा हात पुढे केला. ग्रुपचे सदस्य आंबिस्ते गावात जाऊन लहागे कुटुंबाला किराणा किट, ताडपत्री, चटई, लुगडे आणि अन्य आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांच्या अडचणीत थोडासा दिलासा दिला.
या मदतीमुळे बायजी लहागे आणि त्यांच्या कुटुंबाला तात्पुरता आधार मिळाला असून, त्यांनी आणि गावकऱ्यांनी ‘यारी दोस्ती ग्रुप’चे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
‘यारी दोस्ती ग्रुप’ हा अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असून, रक्तदान, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, तसेच आपत्कालीन मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो. पावसामुळे झालेल्या या संकटातही त्यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती देणारी आहे.



Comments