top of page

राज्यभरात एफडीएच्या छापेमारीने भेसळखोरांच्या झोपा उडाल्या; वर्ध्यात ‘ पतंजली’ सुपर मार्टवर छापा

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाईची मोहिम उघडली असून वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये केलेल्या छाप्यांमुळे व्यापारी व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह दावे करणारी औषधे, खर्रा, संशयित ज्यूस आणि भेसळीच्या संशयातील मसाला पावडर असा लाखोंचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.


वर्ध्यातील सेवाग्राम मार्गावरील महिलाश्रम परिसरातील पतंजली चिकित्सालय व आयुर्वेदिक सुपर मार्टवर एफडीएने सोमवारी अचानक छापा टाकला विविध गंभीर आजारांवर उपचाराचे दावे करणारी औषधे विकली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तब्बल तीन तास चाललेल्या तपासणीत औषधे आणि जादूटोणादी आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954 चे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत 44 हजार 781 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला.


दुसरीकडे, यवतमाळ शहरातही एफडीएने पानटपर्‍या, ज्यूस सेंटर आणि मसाला निर्मिती केंद्रांवर धडक छापेमारी केली आहे. विविध पानटपर्‍यांमधून सुमारे 22 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच खर्रा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीनही ताब्यात घेण्यात आली.


शारदा चौक परिसरातील एका न्यूटिशनल ज्यूस विक्री केंद्रातून सुमारे एह लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून विविध नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर बोबडे ले-आऊट परिसरातील मसाला निर्मिती केंद्रावर छापा टाकून भेसळीच्या संशयावरून 18 हजार रुपयांची मिरची पावडर जप्त करण्यता आली आहे.


राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाने अवैध व भेसळयुक्त पदार्थांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या कारवायांमुळे नियमबाह्य व्यवसाय करणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक पानटपर्‍यांनी मंगळवारी शटर बंद ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले.


हिंगोलीत एफडीएची मोठी कारवाई: नागपूर मार्गावरून छत्तीसगड, दिल्लीकडे नेल्या जाणार्‍या किडलेल्या सुपार्‍यांचे तीन ट्रक अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून पकडले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथे मंगळवारी दि.9 जून रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 88 हजार 554 किलो सुपारी, तीन ट्रक असा 2 कोटी 34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात सुपारी विक्रेते व सुपारी घेणारे अशा 8 जणांविरोधात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


तुकाराम मुंडे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर या विभागाने कारवायांचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे ठिकठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा परिसरातून 8 जून रोजी दिल्ली, छत्तीसगड आदी भागांमध्ये ट्रकमधून सुपारी घेऊन जात असल्याची माहिती हिंगोलीच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. जीएसटी बिल न अदा करता, शासकीय महसूल बडवून आणि मानवी सेवनास असुरक्षित असणारी ही सुपारी असल्याची महिती अधिकार्‍यांना मिळाली. त्यावरुन सोमवारी रात्री 7:30 वाजता येथील रामदेवबाबा ढाब्यावर या ट्रकची तपासणी करण्यात आली.


दोन कोटी 34 लाख 64 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त : ट्रक क्रमांक एम एच 40 बीएफ 9118 मध्ये 77,97,720 रुपये किमत असेलेले सुपारीचे 415 पोती (वजन 29048किलो), एमएच 40 बीएफ 9909 मध्ये 77 ,90470 रुपयांची 420 पोती होती ज्याचे वजन 29398 किलो व के.ए. 70 4205 मध्ये 79,75,970 रुपयांची 430 पोती ज्याचे वजन 30098 किलो सुपारी आढळून आले. सबंधीत सुपारी ही कीड लागलेली रंगमिश्रीत व मानवी सेवनास असुरक्षित होती. अशा सुवारीची वाहतूक, विक्री व खरेदी केल्याने तसेच कुठल्याही प्रकारची जीएसटीचे बिल न वापरता कच्चे बिल वापरुन नेली जात होती. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल देखील बुडाला आहे. तीन ट्रक व सुपारी असा एकूण 2 कोटी 34 लाख 64 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी जप्त केला आहे.


8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल : तिन्ही ट्रक आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी तुषार श्रीराम घोपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाबा तुकाराम शिंदे (वय 42 रा. जातेगाव, ता. करमाळा,जि.सोलापूर ट्रक चालक) सुरेश अंकुश शिंदे (वय 26 रा. गिरवली , ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, ट्रक चालक) अशोक बळीराम शिंदे (वय 40 रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर ट्रक चालक) सुपारी विक्रेता श्री शिव ट्रेडर्स (शिवमोग्गा), रामसी ट्रेडर्स (शिवमोग्गा) व सुपारी घेणार गणपती प्रॉडक्टस् (छत्तीसगड), डिलाईट ट्रेडर्स (दिल्ली) आणि श्री श्रीधर ट्रान्सपोर्ट अशा एकूण 8 जणाविरोधात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक शरद मरे या प्रकरणाचा तपास करत आहेत

Comments


bottom of page