top of page

वनविभागाच्या घनवनाची सुरक्षा कुंपनाची जाळी गायब ! बिडच्या शिरुर कासार तालुक्यातील चित्र; घनवनतील झाडांवर कुर्‍हाड, चराईला रान मोकळं

ree

बीड: वनक्षेत्राच्या वाढीसाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कमीवेळेत वननिर्मीतीच्या संकल्पनेनुसार वनजमिनीत घनवनाची संकल्पना राबवली. कोट्यावधी रुपये खर्चून राबवलेल्या या उपक्रमाच्या देखभाल संगोपनावर वर्षाकाठी कोट्यावधी रुपये खर्चीले जात आहेत. मात्र, वनविभागातील मोजक्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे या महत्वकांक्षी उपक्रमास देखभाल, व्यवस्थापन, संरक्षणा अभावी घरघर लागल्याचे चित्र बीडच्या शिरुर कासार तालुक्यात पहावयास मिळत आहे.


पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलावड हा एकमेव पर्याय सांगण्यासाठी कोणत्या जानत्याची अवश्यकता नाही. जनजागृती आणि कायद्याच्या प्रसारामुळे वृक्षलागवडीचे महत्व सर्वघटकांमध्ये रुजले आहे. वृक्षतोडीला पायबंद घालण्यासाठी शासनस्तरावरून दंडात्मक कायद्याचे निर्माण करण्यात आले आहे. हवामान बदलामध्ये नैसर्गीक साधन, संपत्तीचे महत्व इथल्या बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व घटकांना उमजले आहे. त्यामुळेच शासनस्तरावरून राबवण्यात येणार्‍या शतकोटी, पन्नास कोटी, दसकोटी वृक्षलागवड हे अभियान नाही तर चळवळ बनली. त्यास निसर्गप्रेमी, समाजिक संस्था, शासन, प्रशासनाचाही मोलाचा वाटा आहेच हे विसरून चालणार नाही.


कमी वेळेत वनाची निर्मिती व्हावी, त्यातून दुर्मीळ, अतिदुर्मीळ स्वदेशी वृक्षांचे संगोपन व्हावे या उद्देशाने सन 2016 मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या संकल्पनेतून घनवन ही संकल्पना राबवण्यात आली. शासनाच्या वनविभागाच्या जमिनीमध्ये कोट्यावधी रुपये खर्चुन स्वदेशी दिर्घआयुषी, दुर्मीळ, अतिदुर्मीळ शेकडो प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. घनवनातील वृक्षांचे संगोपन, जतन व्हावे यासाठी शासनस्तरावरून व्यवस्थापन, संगोपनावर वार्षिक तरतुदही करण्यात आली.

दरम्यान, घनवनासाठी संरक्षण कुंपन, त्यातील वृक्षरोपांना पाणी यासह देखभालीवर वनविभागामार्फत लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, शिरुर कासार तालुक्यातील सर्वे नंबर 51 मधील घनवनाच्या संरक्षण कुंपनाची जाळी गायब झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. वनविभागाच्या गलथान आणि निष्क्रिय कारभारामुळे येथील घनवनातील वृक्षांवर कुर्‍हाड पडल्याचेही निर्दशनास आले आहे. संरक्षण कुंपनाची जाळी गायब झाल्याने गुरांना थेट घनवनात चराईला मोकळं रान सापडल्याने घनवनाची दुरावस्था झाली आहे. दर्शनी भागातील गेट कुलूप बंद आणि पाठीमागील बाजूची जाळी गायब या स्थितीमुळे समोर आलेल्या अभ्यंगतांना व्यवस्थापनाची टापटीप दिसत असली तरी घनवनातील वृक्षांकडे पाहून जबाबदार प्रशासनाविरोधात चिड निर्माण होत आहे.


शिवाय, सर्वे नंबर 96 मध्ये नवगन राजूरी- चिंचपूर महामार्गा लगत वन विभागाने वननिर्मीतीसाठी केलेल्या वृक्षलागवड क्षेत्रालाही संरक्षण कुंपन, शेततलाव निर्माण केला आहे. कुलूप बंद क्षेत्रामध्ये सर्रास गुरांचा वावर अढळून येत असल्याने येथील वृक्षांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. दरम्यान कुलूप बंद क्षेत्रात जनावरांचा वावर होतोच कसा असा प्रश्न महामार्गावरून ये-जा करणार्‍या वाटसरुंना पडला आहे. वंनाच्या प्रभावी संवर्धन, संगोपानासाठी तालुक्यातील सर्व घनवासह वृक्षलावड क्षेत्रातील वृक्षतोडीचा सर्वे करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.


दुरावस्थेला जबाबदार कोण?: शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाला घरघर लागल्याचे चित्र असले तरी या अवस्थेला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे. वनविभागाच्या यंत्रणेला याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र असल्याने निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत असतानाच जिल्ह्याबाहेरील त्रयस्त समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी निसर्गप्रेमींतून केली जात आहे.


घनवनातील संरक्षण कुंपनाची चोरीला गेलेल्या तरीचा तपास करण्यात यावा, वृक्षतोडी संदर्भात योग्य चौकशी करून दोषींवर वनगुन्हे अंतर्गत कारवाई करण्यात यावी. घनवनाची तात्काळ देखभाल दूरुस्ती करण्यात यावी.

सिद्धार्थ सोनवणे

मानद वन्यजीव रक्षक बीड

Comments


bottom of page