वाणगाव येथे गौरी उत्सव
- Navnath Yewale
- Sep 3, 2025
- 1 min read
शिवसेना युवा- एल्गार आघाडी, झलकारीबाई महिला बचत गटाचा पुढाकार

डहाणू : तालुक्यातील वाणगाव येथे पारंपारिक गौरी (गवुर) पूजनाचा उत्सव २०२५ प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना, युवा एल्गार आघाडी व झलकारीबाई महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण भागात विवाहित महिला मोठ्या संख्येने पारंपारिक पद्धतीने गवुर पूजन करतात. जंगलातील इंदवी फुलाचे पूजन, घरातील ओटीपासून चुलीपर्यंत लाल मातीने सारवणे आणि तांदळाच्या पिठाचे हाताचे ठसे उमटविणे ही या परंपरेची वैशिष्ट्ये आहेत.
नंतर गौरी मातेला नैवेद्य व फळे अर्पण करून पूजा केली जाते. या निमित्ताने गाव पाड्यात पारंपारिक गौरी नाच रंगतो.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना युवा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना विधानसभा संघटक अँड. विराज गडग यांनी बोलत असताना सांगितले आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी अशा सण-उत्सवांचे आयोजन होणे अत्यावश्यक आहे.
समाजाने आपले सण मोठ्या उत्साहात साजरे करून एकी दाखवावी. शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी बोलताना सांगितले मी सुद्धा आदिवासी भागातून समाजकार्यात उतरलो आहे. इथल्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना सदैव पाठीशी राहील.तर माजी आमदार अमित घोडा यांनी अँड. विराज गडग यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवत समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.
आदिवासी सेवक पुरस्कार सन्मानित वसंत भसरा यांनी आपल्या भाषणात समाजातील बांधवांनी एकत्र येऊन परंपरा जपण्याचे आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. तसेच वैदेही वाढाण माजी जि.प.अध्यक्षा व तालुका अध्यक्ष संतोष देशमुख, यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला कुंदन संखे, वैदेहीताई वाढण, अमित घोडा, संतोष देशमुख, अभिजीत देशक, सुधीर घाटाळ, कौशल कामडी,प्रविण वरठा,विनय आघाव, सचिन ठेमका (यूट्यूब कलाकार), वेशु गुहे, नकुल घाटाळ यांच्यासह शेकडो मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. युवा एल्गार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाठे,डॉ. स्वप्नील गडग, डॉ.मंजु गुसाई-गडग, डॉ. दर्शना गडग, अजय हबाली, अनुप पाटील, तुळशी गडग, रघु वारंगडे आदींनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी झलकारीबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा रजनीताई गडग व सर्व महिलांनी मोठी मेहनत घेतली. या प्रसंगी पारंपारिक गवुर नाच आणि तारपा नृत्याचे सादरीकरणही झाले. वाणगावसह वनई, वेती, सुर्यानगर, निकणे,ऐना,गोवणे,शिगाव, साये, वधना, गंजाड, रायतळी आदी गावांमधील महिला व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शेवटी अँड. विराज गडग यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्वांना गौरी पूजनाच्या शुभेच्छा दिल्या.



Comments