top of page

विक्रम घोरपडे ठरला माळेगाव केसरी, कुस्ती मैदानात चमकदार कामगिरीदैवयानी मानेने पुरुष मल्लाला केले पराभूत

नांदेड: माळेगाव यात्रेनिमित्त वीर नागोजी नाईक कुस्ती मैदानात आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील भगतवाडी येथील विक्रम शंकर घोरपडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत माळेगाव केसरीचा मान पटकावला.

विजेते विक्रम घोरपडे यांना रोख ५१ हजार रुपये, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, गदा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत आबू चाऊस हे उपविजेते ठरले. त्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, हार, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.


स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्षीस चार मल्लांना विभागून, तर तृतीय क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीसही चार मल्लांना विभागून देण्यात आले. या सर्व विजेत्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

 विक्रम घोरपडे व आबू चाऊस यांच्यातील अंतिम कुस्ती सुमारे एक तास रंगली. दोन्ही मल्लांनी सादर केलेल्या विविध डावपेचांचा आनंद घेण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ही कुस्ती स्पर्धा लोहा पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, रोहिदास टेंभुर्णी, मोहन मेहञी, श्रीराम झपाठक, घोडके व शेख रसूल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौशल्य यांनी केले.

 

 

पुरुष मल्लाला केले पराभूत

 

माळेगावच्या कुस्ती मैदानात झालेल्या कुस्त्यांमध्ये दारव्हा तालुका, दिग्रस जि. यवतमाळ येथील दैवयानी वासुदेव माने हिने पुरुष कुस्तीगीराला पराभूत करत दोन हजार रुपयांची कुस्ती जिंकून उपस्थितांची मने जिंकली. दिल्ली येथून आलेल्या एका महिला कुस्तीगीराचीही कुस्ती माळेगावात लागली होती.

दैवयानी माने ही दारव्हा येथील रहिवासी असून सध्या ती बारावी मध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच कुस्ती या खेळात ती सातत्याने प्रगती करत आहे. मराठवाडा, विदर्भ, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक या राज्यांमध्ये तिने कुस्ती खेळली असून अनेक ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी तिने केली आहे. शालेय स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत तिने यश संपादन केले आहे.

       मागील अडीच वर्षांपासून ती नियमितपणे विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे. परभणी येथील राजे संभाजी आखाड्यातील प्रशिक्षक अण्णा डिगोळे यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे. दैवयानीचे वडील वासुदेव माने हे स्वतः मल्ल असून वडिलांकडूनच तिने कुस्तीतील अनेक डावपेच आत्मसात केले आहेत. दैवयानी दररोज सकाळी दोन तास व रात्री दोन तास नियमित सराव करते. अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधत ती आपली वाटचाल करत आहे.

     यावेळी बोलताना दैवयानी माने म्हणाली, आजच्या युगात मुलींनी विविध खेळांमध्ये सहभागी झाले पाहिजे. कुस्ती, कराटे यासारखे खेळ आत्मसात करणे आवश्यक आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी मुलींनी सक्षम बनले पाहिजे. मुलगा व मुलगी यात काहीही फरक नाही. अनेक क्षेत्रांत मुली मुलांपेक्षा पुढे जात आहेत.

 

कुस्तीची आवड आयुष्यभराची

 

माळेगाव यात्रेतील कुस्ती पाहण्यासाठी वाघदरा ता. गंगाखेड जि. परभणी येथील भगवान भानुजी सापत वय ७६ यांनी खास उपस्थिती लावली होती. त्यानी तब्बल ३५ वर्षे कुस्ती खेळली आहे. सध्या वयोमानामुळे कुस्ती खेळता येत नसली तरी कुस्तीची प्रचंड आवड असल्याने माळेगावसह अनेक ठिकाणी ते कुस्ती पाहण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments


bottom of page