top of page

विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

सर्पराज्ञी उपचार सुरू, बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा



शिरूर कासार तालुक्यात पैठण पंढरपूर  महामार्गा लगत असलेल्या खोल्याचीवाडी  येथील पांडुरंग खोले यांच्या विहिरीत सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडला. या  घटनेची माहिती वन विभाग व सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रास दिली. त्यानंतर चार तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला बाहेर काढून  तागडगाव येथील सर्पराज्ञी  वन्यजीव पुनर्वसन  केंद्रात हालविले.


 

    या बाबत समजलेली माहिती अशी ,शेतकरी पांडुरंग खोले हे यांच्या विहिरीत सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास विहिरीतील सौर ऊर्जा पंप चोरी होण्याचे प्रमाण सुरू झाल्यामुळे आपल्याही विहिरीतील सौर ऊर्जा पंप चोरी गेला आहे का? नाही.  हे आपल्या विहिरीतील पंप पाहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीच्या सदर मध्ये बिबट्या दिसून आला . त्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभाग ,सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच वन विभाग व सर्पराज्ञीचे संचालक मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. चार तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्यास विहिरीतून सुखरूप बाहेर  काढले.


 बिबट्या विहिरीत पडल्या असल्याच्या बातमीने परिसरातील व गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती ही गर्दी रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील व तहसीलदार सुरेश घोळवे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे हे कर्मचाऱ्यासह या ठिकाणी दाखल झाले होते.


 चार तासाच्या अथक परिश्रमानंतर    सर्पराज्ञीचे संचालक मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे यांनी त्या बिबट्यास पोत्याच्या सहाय्याने हाताने पकडून त्यास पिंजऱ्यात जेरबंद केले . बिबट्या  अशक्त झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यास  सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले. या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी डॉ. खाडे व सर्पराज्ञीच्या  संचालिका सृष्टी सोनवणे यांनी या बिबट्याची पाहणी करून त्यावर योग्य उपचार केले. सदरील बिबट्याच्या प्रकृती सुधारणा होत असल्याची माहिती सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली.


 सदरील बिबट्याला वाचविण्यासाठी विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ व श्रीकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे,वन विभागाचे कर्मचारी वनपाल अजय देवगडे, वनरक्षक राजेश जोशी, वनरक्षक काकडे यांनी परिश्रम घेतले.

Comments


bottom of page