शूरवीर अग्नीशमक शुभांगी घुलेचा आयुक्ताकडून सन्मान
- Navnath Yewale
- Jul 22, 2025
- 1 min read

पनवेल,दि.22: जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धा 2025 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशामक शुभांगी घुले यांचा आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांनी आज दिनांक 22 जुलै रोजी झालेल्या बैठकित पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पनवेल महापालिकेचे नाव जागतिक स्तरावरती उज्वल केल्याबद्दल आयुक्तांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी महापालिकेचे यावेळी अतिरीक्त आयुक्त कैलास गावडे , उपायुक्त सर्वश्री डॉ.वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, स्वरूप खारगे, अभिषेक पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक नगररचनाकार केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे , लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरिक्षक संदिप खुरपे, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण , सर्व प्रभाग अधिकारी ,सर्व विभाग प्रमुख ,अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, अग्निशमन विभागाच्यावतीने देशपातळीवर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये महापालिकेच्या अग्निशामकांनी सहभाग घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशा पध्दतीने विविध स्पर्धांमध्ये अग्निशामकांना यशस्वी होण्यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
नुकत्याच अमेरिकेतील अल्बामा येथे पार पडलेल्या 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धा 2025 मध्ये महापालिकेच्या अग्निशामन विभागाच्या अग्निशाकम शुभांगी घुले यांनी "अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज" या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव उज्ज्वल केले होते, तसेच 'फायर स्टेअर रेस'मध्ये सांघिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले. तसेच 'फायर फायटिंग चॅलेंज' स्पर्धेत चौथे तर 'फायर स्टेअर रेस वैयक्तिक स्पर्धेमध्ये पाचवे स्थान पटकाविले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उच्च दर्जाची व्यावसायिक चाचणी घेणाऱ्या या स्पर्धेत शुभांगी यांनी तडफदार, वेगवान आणि अचूक कामगिरी करत जागतिक पातळीवर भारताचा तिरंगा उंचावला. तसेच पनवेल महानगरपालिकेचे नाव देशपातळीवरती उज्वल केले आहे.



Comments