शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चु कडूंचा एल्गार
- Navnath Yewale
- Jul 24
- 2 min read
राज्यभर चक्काजाम, रास्तारोको; वाहनांच्या लांबच लांब रांगा, आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली

राज्यात शेतकरी, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर दुर्लक्षित घटकांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण मार्गावर संतप्त आंदोलक रस्त्यावर उतरल्याने वाहतूक खोळंबली आहे. सरकारने दिलेली अश्वासने पाळली नसल्याने प्रहारकडून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी मोझरीच्या गुरुकुंज आश्रमात 8 जून पासून उपोषण सुरू केलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर केलेल्या या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मध्यस्थी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन अश्वासने दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. मात्र, त्यानंतरही सरकारने ठोस पावलं न उचलल्याने बच्चू कडून यांनी पदयात्रा आणि आता चक्काजाम आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
दरम्यान,प्रहार पक्षाच्या आंदोलनाने आता जोर धरला असून बच्चू कडू यांनी थेट सरकारवर निशाणा साधत “सरकारलाच वाटतं महाराष्ट्र अशांत राहावा. म्हणून शेतकर्यांना न्याय देण्यात टाळाटाळ केली जाते. सरकार दिशाभूल करत आहे आणि आम्हला दबावतंत्राने थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे ” आंदोलन आता सरकारच्या हातात राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांच्या चक्का जाम आंदोलनास सत्ताधारी आमदारांसह
विरोधीपक्षातील आमदार, खासदारांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर मनसेसह इतर संघटनांचेही समर्थ मिळाले आहे. पावसाचे अपयशी अंदाज कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त भूमिका आणि शेतकर्यांची वाढती निराशा लक्षात घेता हे आंदोलन व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतीचे काम सुरू असले तरी, शेतकर्यांमध्ये असंतोष आहे आणि प्रहारच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळू शकतो.
चक्काजाम रोखण्यासाठी सरकारने नागपुरात प्रहारच्या 200 हून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. याला बच्चू कडून यांनी विरोध दर्शवत “ जिथे पोलिस अधीक्षक आंदेालन करू देणार नाहीत, तिथेच आम्ही चक्काजाम करू ” असा दावा केला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये रस्ते रोखले जाण्याची शक्यता आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. प्रहारच्या मागण्या केवळ कर्जमाफीपुरत्या मर्यादित नसून, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ व ग्रामपंचायत कर्मचार्यांपर्यंत विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे हे आंदोलन एका समाजघटकापुरतं मर्यादित न राहता, राज्यभरातील असंतोषाचं प्रतीक बनू शकतं.
मध्यप्रदेशात जाणार्या अमरावती महामार्गावर बच्चू कडू यांच्यासह शेकडो आंदोनकर्त्यांनी चक्काजाम केल्याने वाहतूक खोळंबली आहे. वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळून घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. आंदोलन अद्यापही सुरूच असून बच्चू कडू मागण्यांवार ठाम आहेत.



Comments