top of page

सत्तेच्या अमरत्वाची तृष्णा...

जागतिक मानवी इतिहास पाहीला तर असे दिसते की, मानवाला अमरत्वाची ओढ आहे कारण त्याला मृत्यूचं भय आहे. खास करून जे जे खलपुरूष इतिहासात होऊन गेले त्यांनी अमर होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. कारण एखाद्या सत्ताधिशाने हस्तगत केली की, त्याने आपल्या सत्तेच्या नि सामर्थ्याच्या बळावर स्वत:ला अमर होण्याचे स्वप्न पाहीले आहे कारण सत्ता हस्तगत करताना त्याने जी कांही हिंसा केली असेल तशी हिंसा आपण सत्तेतून पायउतार झाल्यावर आपल्याबाबत होऊन आपला मृत्यू क्लेशदायक होईल, अशी भीती त्याला असते.


रशियातून नुकतीच एक बातमी आली आहे की, रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी सुमारे 2.15 लाख कोटी रूपयांचा स्वत:च्या अमरत्वासाठीचा गुप्त प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या पुतीन हे 73 वर्षाचे असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सध्याच्या प्रयत्नातून त्यांना एकूण 120 वर्षाचं आयुष्य मिळवायचं आहे. यासाठी त्यांनी वय रोखण्यासाठी जीन थेरपी ट्रीटमेण्ट सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी त्यांनी उणे 112 डिग्री तापमानाच्या अतिथंड पाण्यात निर्वस्त्र उभे राहण्याचा प्रयोग केला होता!


हा प्रयोग यशस्वी होऊन पुतीन यांनी 120 वर्ष पुर्ण केली तर ते 120 व्या वर्षीही राष्ट्राध्यक्ष असतील आणि 120 व्या वर्षी कदाचित पुढील अमरत्वाचा प्रयोगही यशस्वी करतील !


पुतीन यांचा हा स्वप्नवत असा प्रकल्प पुर्ण करण्याची जवाबदारी त्यांची डॉक्टर मुलगी मारीया वोरोत्सोवा हीच्या देखरेखीखाली चालू आहे. याशिवाय डॉ. मिखाईल कोवलचुक हे संशोधक येत्या तीन चार वर्षात म्हणजे 2030 पर्यंत नवीन अवयव तयार करून ते नवीन अवयव पुतीन यांच्या शरीरात प्रत्यारोपित करून जूने अवयव बदलण्यात येतील. शिवाय क्रायोथेरपी तंत्रज्ञान वापरून रक्त गोठवणे व डुकराच्या प्रजातीपासून नवीन अवयव निर्माण करणे हे देखील या प्रकल्पात अंतर्भूत आहे.


पुतीन हे कधी पंतप्रधान म्हणून तर कधी राष्ट्राध्यक्ष म्हणून 1999 पासून रशियाचे सत्ताधिश आहेत. म्हणजे गेली 26 वर्ष सत्तेत आहेत आणि 120 वर्ष जगणार म्हटल्यावर अजून 47 वर्ष ते सत्तेत राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वच अचाट नि अफाट आहे.


पुतीन यांनी गेली 26 सर्व सत्तेत राहण्यासाठी काय काय केले हा या लेखाचा विषय नाही. पण त्यांनी जे कांही केलं आहे, त्याची स्मृती आणि कृत्यांची स्वप्ने त्यांच्या वर्तमानाला अस्वस्थ करत असावीत म्हणून त्यांनी हा स्वप्नवत प्रकल्प हाती घेतला असावा.


जगाच्या इतिहासात अलेक्झांडर हा जेंव्हा मँसीडोनियाचा राजा झाल्यावर त्याने अमर होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते म्हणतात. प्राचीन इजिप्शियन राजे देखील अमरत्वाच्या आशेने एवढे झपाटलेले होते की, ते मृत्यूला मृत्यू न म्हणता दुस-या विश्वात जाण्याचा मार्ग म्हणून स्वत: सोबत दासदासींना ठार मारून आपल्या कबरीत गाडत होते. आपण अमर होऊ या आशेने चीनी सम्राट चिंग शी व्हांग ने मातीचे 8000 सैन्य निर्माण करून आपल्या कबरीत 2000 वर्षापुर्वी उभारले होते. अमर होण्याची भुरळ जवळपास सर्वच क्रुर राजांना होती हेच यातून दिसते.


हॉलीवुड मधे ‘इंडियाना जोन्स’ असो वा ‘द ममी’ सारख्या सिनेमांची कथा अमरत्वाचे वरदान मिळविण्यासाठी केलेल्या मानवी प्रयत्नांचे दर्शन आहे. भारतीय प्राचीन पुराणे तर अशा कथागाथांनी भरलेली आहेत. महिषासुर, हिरण्यकशिपू, रावण, जरासंध, दुर्योधन आणि अशा कित्येक क्रुर शासकांनी अमरत्वाचे वरदान मिळवले होते म्हणतात पण देवांनी अनेक खटपटी करून त्या दैत्यांना मारले अशी लोकांची श्रद्धा आहे.


सत्ताधिशांचे मृत्यूचे भय हे त्यांना अमरत्वाची भुरळ पाडणारे आहे. कारण सत्ताविहीन जगणे ज्यांना कठिण असते वा ज्यांच्या सत्ताप्राप्तीचा उद्देश द्वेषशमन नि सुड असतो असे सत्ताधिश सत्ता सोडू ईच्छित नाहीतच नव्हेतर सत्तेवर राहण्यासाठी अमरत्वाचा कंठा गळ्यात घालून आपल्या जीवनाबरोबर आपल्या सत्तेच्या सिंहासनालाही अमरत्व प्राप्त करण्यासाठी धडपडतात.


भारतात मर्यादा पुरोषत्तम प्रभु श्रीराम वा योगेश्वर श्रीकृष्ण यांनी कधीही अमरत्व मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. श्रीराम शरयूत अंतर्धान पावले तर श्रीकृष्ण यांच्या पायाला बाण लागल्यामुळे त्यांचे कार्य समाप्त झाले. ज्या दोन महापुरूषांना भारतीय समाज दैवत मानतो त्यांनाही अमरत्वाची आस नव्हती हे विशेष!


भारतीय तत्वज्ञानात भगवान गौतम बुद्ध यांनी मानवी जीवनाच्या मर्त्यतेचे तत्व सांगून मानवी जीवनाची महानता सांगीतली. याबद्दल अनेक जातककथा आहेत, आणि बुद्ध हे ऐतिहासिक व्यक्तीमत्व आहे म्हणून त्यांच्या विचारांचे महत्व अधिक आहे.


भारतात अनेक लेखकांनी भारतीय तत्वचिंतनातील अमरत्व ही संकल्पना अभिलाषा वा तृष्णा स्वरूपात मांडली.

ययाती ही कादंबरी अमरत्व नि तारूण्य याची मानवी मनातील अभिलाषा स्पष्ट करताना त्याला वैगुण्य या अर्थाने पाहते. पण अमरत्वाचे गौरवीकरण करत नाही. अमरत्वाला भारतीयांनी चिरंजीवत्व असे नांव देऊन अश्वत्थामा या महाभारतातील पात्राने अमरत्वाला शाप या स्वरूपात मांडले आहे. जी. ए. कुलकर्णी यांची भेट ही कथा अमरत्वाला शाप ठरवून मानवी प्रबोधन करते.


सत्ताधिशांचे अमरत्वाचे प्रेम हे निस्वार्थी वा जनसेवेप्रती निष्ठा असणा-या बोधीसत्व संकल्पनेसारखे नसून ते निव्वळ सत्तेवर राहण्यासाठी मृत्यू अडसर बनू नये यासाठी आहे. कारण राम, कृष्ण यांच्याप्रमाणेच महावीर, बुद्ध यांनीही अमरत्वासाठी प्रयत्न केलेले नाहीत. कारण ते राजपुत्र असूनही ते सत्ता त्यागून महान बनले होते, त्यांच्या महानतेत सत्तेचे दासत्व नव्हते.


पुतीन या अमरत्वाच्या प्रकल्पामुळे रशियन इतिहासातील रासपुतीन या अशाच एका व्यक्तीमत्वाची आठवण करून देणारा आहे. रासपुतीन हा स्त्रीलंपट, व्यभिचारी, अनितीमान असा होता. आज तो असता तर त्याचे नांव एपस्टिन फाईल्स मधेच शोभून दिसले असते. पण तो तसा थेट सत्ताधिश नव्हता पण राजा निकोलस झार नि राणी अलेक्झांड्रा यांचे आधारे तोच रशियाचा सर्वसत्ताधिश बनला होता. विविध रोग बरे करून, प्रदिर्घ तारूण्य नि बलशाली दिर्घाआयुष्य देण्याची स्वप्ने दाखवत त्याने झारशाही ताब्यात घेतली होती. स्वत:ला दैवी समजणा-सा या रासपुतीनचा मृत्यू 29 डिसेंबर 1916 रोजी बंदुकीच्या गोळ्या खाऊन झाला.


आज अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप, चीन मधे शी जींनपींग, कोरीयात किम जोंग, ईस्राईलमधे नेतन्याहू भारतात नरेंद्र मोदी सत्तेत आहेत आणि आणखी असे अनेक देश आहेत, ज्यात त्यांचे सत्ताधिश अनेक वर्ष सत्तेत आहे कारण आपपल्या देशात सत्तेत राहण्यात ते यशस्वी झालेले आहेत. ते कसे यशस्वी झालेत हा या लेखाचा विषय नाही पण प्रत्येकाला सत्ता गेल्यावर आपले काय होईल ही भीती आहे. मोदींनी स्वत:ला नॉन बायोलॉजीकल असल्याचा केलेला दावा नि मोदी भक्तांनी त्यांना दिलेली ईश्वरी अवताराची उपमा या परीप्रेक्ष्यात पाहता येईल काय? याचे उत्तर अजून तरी समोर येत नाही. मोदीजींची मजल आजवरच्या माहीतीनुसार केवळ मशरूम सेवन करण्यापर्यंतच आहे हे विशेष कौतुकास्पद आहे !


-राज कुलकर्णी

लेखक ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या

विचार विभागाचे राष्ट्रीय समन्वयक

आहेत


Comments


bottom of page