सीआयडी कार्यालयासमोर रोहित पवार समर्थकांचा राडा!
- Navnath Yewale
- 9 hours ago
- 1 min read

पुणे: अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्या सीआयडी कार्यालयात आज दुपारी मोठा राडा झाला. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना चौकशीसाठी बोलावले असताना त्यांना ‘ शाही पाहुणचार केल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या समर्थकांसह सीआयडी मुख्यालय गाठले. यावेळी पोलिस अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह सीआयडी कार्यालयात दाखल झाले असता अधिकार्यांनी सुरक्षेचे कारण देत सर्व कार्यकर्त्यांना आत घेण्यास स्पष्ट मनाई केली. केवळ रोहित पवार आणि अन्य सात जणांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी रोहित पवारांचे खंदे समर्थक रविकांत वरपे आणि सीआयडी अधिकार्यांमध्ये आत जाण्यावरून शाब्दीक चकमक झाली. यामुळे काही काळ सीआयडी कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाची चौकशी केली जात आहे की त्याची बडदास्त ठेवली जात आहे? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. व्ही. के. सिंह सकाळी 11:00 वाजल्यापासून कार्यालयात होते. आठ तास चौकशी झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचा पाहुणचार करण्यातच वेळ घालवला गेला, असा दावा पवारांनी केला आहे. रात्रीच्या वेळी काळ्या काचा असलेल्या पोलिसांच्या गाडीतून सिंह यांची एखाद्या सन्माननीय पाहुण्यासारखी पाठवणी का केली गेली? यामागे नक्की कोणते ‘काळेबेरे’ आहे, असा प्रश्न त्यांनी सोशल मिडियावर पोस्टद्वारे केला आहे.
...त्या अधिकार्यांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी प्रशासनावर ताशेरे ओढताना म्हटले आहे की, कितीही काळे पडदे टाकून हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न झाला, तरी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या प्रवृत्तींचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देत या प्रकरणी काळे कारनामे करणार्यांना व्हीआयपी वागणूक देणार्या अधिकार्यांच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही रोहित पवार म्हणाले.



Comments