कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी नार्को टेस्टला परवानगी देईल - मंत्री बावनकुळे
- Navnath Yewale
- Aug 6
- 1 min read

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझी नार्को टेस्ट करण्यास कोणतीही अडचण नाही. मी त्याला परवानगी देईन. जात पडताळणी करणारा विभाग हा अर्ध न्यायकि विभाग आहे. त्यात शासनाला हस्तक्षेप करता येत नाही. जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयात माझा किंवा सरकारमधील मंत्र्यांचा हस्तक्षेप आहे, असे म्हणणे अयोग्य ठरेल. पडताळणीचा विभाग स्वतंत्र असून ते त्यांच्या अधिकारात काम करतात, असं प्रत्यूत्तर मंत्री बावनकुळे यांनी दिले.
जात पडताळणी समितीने कोणताही निर्णय दिला असला तरी त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील करता येते. आमच्यावर अन्याय झालेला आहे. असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन त्या निर्णयावर स्थगिती आणता येते, असेही बावनकुळे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या इतर आरोपांवर आपण प्रतिक्रिया देणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले, जात पडताळणी समितीच्या निर्णयावर आक्षेप असेल तर उच्च न्यायालयात त्या संदर्भात अपील करावे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
ठाणे जिल्ह्यातील भाईंदरपाडा- ओवळे या भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यातील 1100 एकर जमिनीचा वाद माझ्याकडे सुरू होता. ही जागा आता वन विभागाच्या नावे करण्यात आली आहे. ही जागा आपली असल्याचा दावा खासगी दावेदारांनी केला होता. त्यांनी दाखल केलेल्या अर्धन्यायिक खटल्याचा निर्णय देण्यात आला असून ही जागा वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे, अशीही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.



Comments