पुण्यातील हडपसरच्या ससाणेनगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना
- Navnath Yewale
- Aug 11
- 1 min read

संतप्त शिवप्रेमी महिलांनी संशयित महिलच्या तोंडाला काळे फासले; शिवप्रेमींकडून संताप, कठोर कारवाईची मागणी
पुणे: पुण्यातील हडपसर परिसरातील ससाणेनगर येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर एका महिलेकडून चप्पल फेकल्याचा प्रकार समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी व शिवप्रेमींनी घटनास्थळी गर्दी केली. संशयित महिलेला पकडून शिवप्रेमी महिलांनी तिच्या तोंडाला काळे फासले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.
ससाणेनगर मधील छत्रपती शिवरांयाच्या स्मारकावर संशयित महिलेने चप्पल व दगडफेकल्याचा आरोप आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकारानंतर स्मारक परिसरात शिवप्रेमींसह नागरिकांनी गर्दी केली. संशयित महिलेस पकडून पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयित महिलेस ताब्यात घेतले.
संशयित महिला अश्विनी दगडे असे नाव सांगते, ती मूळची सोलापूरची असून ससाणेनगरमध्ये किरायाच्या घरात एकटीच राहत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटना घडल्या नंतर तीने स्वत:च्या फोनवरून संपर्क करत ‘ काम हो गया ’ असे संभाषण केल्याचा दावाही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यामुळे ससानेनगर येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सन 2024 मध्येही याच स्मारकाची विटंबना झाली होती, त्यामुळे स्मारकास काचेचे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिवप्रेमींनी स्मारक परिसरात आंदोलन सुरू केले आहे. शिवाय स्मारकास कायमस्वरूपी पुोलिस संरक्षणाचीही मागणी करण्यात येत आहे.
संशयित महिलेची कसून चौकशी करून त्या मागील सूत्रधारास तत्काळ अटक करण्याची मागणीही संतप्त शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून संशति महिलेस ताब्यात घेतले जमावाला शांततेचे आवाहन करत दोषींवर कारवाईची अश्वसान हडपसर पोलिसांनी दिले आहे.



Comments