भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये मिळणार !
- Navnath Yewale
- Aug 23
- 1 min read

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवाला 2025 पासून राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने यंदा या उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने राज्यातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदिसाठी 25,000 रुपयांचे भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली.
यंदा प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, यानिमित्ताने राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून, राज्यातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25,000 रुपये भांडवली अनुदान देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे 14 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयात नमूद आहे. नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना हे अनुदान मिळणार असून, यासंदर्भातील अटी व शर्तींचा स्वतंत्र शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
भजनी मंडळांना हे अनुदान मिळवण्यासाठी शासनाच्या वेबपोर्टल वर 23 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावे लागतील. अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मंडळांना प्रथम नोंदणी करावी लागेल. यामध्ये प्रशासकीय विभाग, जिल्हा, तालुका, गाव किंवा नगरपालिका/ नगरपंचायत निवडावी लागेल. त्यानंतर मंडळाचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी नोंदवून लॉगिन करावे लागेल. लॉगिननंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.
सांस्कृतिक उपक्रमांना चालना
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा आणि भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्याची सरकारचा मानस आहे. या अनुदानामुळे भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदी करणे सुलभ होणार असून, गणेशोत्सवातील सांस्कृतिक उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments