भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ईडीचा फास आवळला; एकाच वेळी नाशिक,पुणे, शिर्डीत छापेतिसर्या गुन्ह्यातील पोलिस कस्टडीची मुदत आज संपली, व्हिसीद्वारे खरात न्यायालयात हजर; शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरा
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

नाशिक: नाशिकच्या बहुचचिर्र्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या वागणूकीबद्दल विचारणा केली असता, त्याने अवघ्या एका शब्दात उत्तर दिले.
सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला आज प्रत्यक्ष न्यालयालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. सात महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या खरातची तिसर्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत आज संपली होती. त्यामुळे एसआयटीने त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले.
सुनावणी सुरु होताच न्यायाधीशांनी सर्वप्रथम आरोपीचे नाव विचारुन त्याची ओळख पटवून घेतली. त्यानंतर न्यायाधीशांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला. पोलिस कोठडीत असताना पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? असे न्यायाधीशांनी खरातला म्हटले. यावर नेहमी ‘ दैवी शक्ती’ आणि तंत्र-मंत्राच्या’ बाता मारणार्या अशोक खरातने एकाच शब्दात उत्तर दिले. “ नाही” असे म्हणत खरातने पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान तिसर्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, एसआयटीने खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती न्यायालयाला केली. तिसर्या गुन्ह्यातील तपासाचा हक्क अबाधित राखून चौथ्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी खरातचा ताबा मिळणे अवश्यक असल्याचे पोलिसांनी अर्जात म्हटले आहे. यानंतर आरोपी तुरुंगात जाईल, त्याची वैद्यकिय तपासणी केली जाईल, त्यानंतर त्याचा ताबा घेण्याच्या सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या. तर अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत नेमके काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईडीची मोठी कारवाई: भोंदू अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाच वेळी छापेमारी करत ईडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहता शाखेत ईडीचे पथक दाखल झाले असून, अशोक खरात नॉमिनी असलेल्या सुमारे 100 खात्यांची चौकशी सुरू आहे. या खात्यांमधून 60 कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिकमध्ये 5, पुण्यात 3 आणि शिर्डीत 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. समता पतसंस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी सुरू असून, खरातच्या मालमत्ता आणि निधीच्या स्त्रोताचा शोध घेतला जात आहे. तर नाशिकमधील तृप्तबाला निवासस्थानी आयकर विभागाकडूनही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. खरेदी-विक्रीशी संबंधीत कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे.

शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची कसून चौकशी : राहता येथील समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावाने असलेल्या चार खात्यांतून तब्बल 2 कोटी 40 लाखांची उलाढाल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. या सर्व खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी होता. या प्रकरणी सोमवार (दि.12) प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी पोलिसांना जाबाब दिला.
पोलिस चौकशीत प्रतिभा चाकणकर यांनी म्हटले की, हे खाते मी उघडले नाही, यातील सही माझी नाही, हे खाते बनावट आहे, मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. देवदर्शनाच्या नावाखाली खरातने कागदपत्र घेतली होती. व्हाट्सपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा खाते उघडण्यासाठी वापर करण्यात आला असं प्रतिभा चाकणकर यांनी म्हटलं आहे.
प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे -पालवे यांनी म्हटले की, प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची बनावट खाती उघडली आहेत. त्या समता पतसंस्थेत कधीही गेल्या नाहीत. खाते उघडताना पत्ता देखील चुकीचा वापरण्यात आला. प्रतिभा आणि तन्मय यांच्या सह्यांचे नमुने पोलिसांना दिले. सर्व खातरजमा झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. चाकणकर पोलिसांना वेळोवेळी सहकार्य आणि तपासात मदत करतील. पोलिसांची चौकशी सुरू आहे, कायदेशीर कारवाई बाबत चर्चा करूनच निर्णय घेऊ, मात्र पतसंस्थेत खाते आहे यासंदर्भात कोणतेही तथ्य नाही.



Comments