top of page

राजकारणी लोकं, अधिकार्‍यांना कुणबी नोंदी रद्द करायला लावतायत, मी माहिती मागवली सरकारने मराठ्यांना फसवलं, सरकारविरोधात मोठी लाट उसळणार- जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर: सरकारने मराठ्यांना फसवलंय, राजकीय लोकं अधिकार्‍यांवर दबाव आणून कुणबी नोंदी रद्द करायला लावतायत. मी माहिती मागवली आहे, माहिती येऊ द्या मग मी काय करायचं ते ठरवतो. आता सरकारच्या विरोधात मराठ्यांची मोठी लाट उसळणार असल्याचा सूचक इशारा मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी जरांगे पाटील यांनी आज (बुधवार, दि. 5) संवाद साधला यावेळी ते बोलत होते.


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. कुणबी नोंदी, जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर मुद्यांना घेऊन त्यांनी सरकारला पुन्हा एकदा घेरलं आहे. आता मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. आता सरकारविरोधात मोठी लाट येणार आहे. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. काही ठिकाणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर जात पडताळणीचा अर्ज मात्र फेटाळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवली जात आहेत. ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारनेच कुणबी नोंदी शोधल्या आहेत. सरकारनेच प्रमाणपत्र दिले आहे. आता त्यांनी ते प्रमाण रद्द केले आहे. यात राजकीय हेवेदावे प्रचंड आहेत. तिकडे राजकारण जळू द्या. मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. परंतु आमच्या समाजाचे नुकसान होत आहे, असा संताप जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.


जिल्हा परिषद सदस्या ज्योजी शिंदे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या रक्ताची नोंद सापडली आहे. मग आता सरकारला त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. ओबीसींचे प्रमाणपत्र रद्द केले जात नाहीत. मराठा समाजावर अन्याय का केला जातोय, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने जाणीवपूर्वक मराठ्यांवर अन्याय केला आहे. हे आता मराठ्यांना समजलंय असा हल्लाबोलही त्यांनी केला.


आता सरकारच्या विरोधात खूप मोठी लाट उसळणार आहे, राजकीय लोक अधिकार्‍यावर दबाव आणत आहेत आणि अधिकार्‍याला कुणबी नोंदी रद्द करयाला लावल्या जात आहेत. मी याबाबतची सगळी माहिती बोलवली आहे. कुणबी नोंदी कशामुळे रद्द केली, हे मला जाणून घेऊ द्या मग मी काय करायचे ते ठरवतो, असा सूचक इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

Comments


bottom of page