top of page

(Vedio)- बीडच्या कारागृहातील कैद्याचा जिल्हारुग्णालयात मृत्यू; पोलिसांना पैसे न दिल्याने मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, 10 तास शवविच्छेदन खोळंबले बीड


येथीलजिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका २७ वर्षीयकैद्याचा मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आशिष अशोक धिवार (रा. काळेगाव घाट ता. केज) असे या मृताचे नाव असून, पोलिसांनी केलेल्या  अमानुष मारहाणीमुळेच त्याचा बळी गेल्याचा खळबळजनक आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत दोषी पोलीस  कर्मचाऱ्यांना  अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह  ताब्यात घेणार  नसल्याचा पवित्रा  कुटुंबीयांनी घेतल्याने  जिल्हा रुग्णालय  परिसरात  तणावाचे वातावरण निर्माण  झाले होते.


आशिष धिवार याला केज पोलिसांनी २३ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली होती. न्यायालयाने त्याला सुरुवातीला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. २५ एप्रिल रोजी त्याला न्यायालयीन  कोठडी  सुनावल्यानंतर त्याची रवानगी बीडच्या जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. २६ एप्रिल रोजी त्याची प्रकृती खालावल्याने  जेल प्रशासनाने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, मंगळवारी सकाळी ८:१० वाजता उपचारादरम्यान  त्याचा  मृत्यू  झाला.

दरम्यान, आशिषचा मृत्यू नैसर्गिक नसून पोलीसांनी त्याला बेदम मारहाण झाल्याचा दावा त्याच्या वडिलांनी आणि भावाने  केला आहे. पोलिसांनी आमच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, आमची परिस्थिती  नसल्याने आम्ही  पैसे देऊ शकलो नाही. यामुळेच रागाच्या भरात पोलिसांनी आशिषला पोलिस कोठडीत बेदम मारहाण केली. असा गंभीर आरोप अशोक धिवार यांनी केला आहे.


मृतदेह ताब्यात घेण्यास नकार अशिषच्या शरीरावर जखमा असल्याचा दावा करत नातेवाईकांनी बीड जिल्हा रुग्णालयात  शवविच्छेदन करण्यास विरोध दर्शवला. हे शवविच्छेदन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात ‘इनकॅमेरा’ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत या प्रकरणावर तोडगा निघाला नव्हता आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.


उपचारांत हलगर्जीपणा केला

आशिष याला जिल्हा रुग्णालयात कैद्यांसाठीच्या कक्षात उपचारासाठी दाखल केले मात्र इथे सुविधांचा अभाव आहे. त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. तो रात्रभर तडफडत होता. उपचारांत हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाला. याची तक्रार सीएस यांच्याकडे केली आहे.

अजिंक्य चांदणे, प्रदेशाध्यक्ष, डीपीआय


स्वारातीत इन कॅमेरा पीमए

रुग्णाच्या नातेवाईकांनी जखमांचे आरोप केल्यामुळे आता अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात ’इनकॅमेरा पीएम’ केले जाईल. त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. उपचारात हलगर्जीपणाचा आरोप योग्य नाही. डॉक्टरांनी स्वतः त्यांच्यावर उपचार केले होते.

सतिषकुमार सोळंकी, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.


रात्री आला सकाळी प्रकृती बिघडली

आशिष धिवार हा बंदी आमच्याकडे शनिवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान आला. त्याला दारुचे व्यसन होते. तो अडिक्ट होता. रविवारी सकाळी  त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला रुग्णालयात पाठवले होते. तो आला तेंव्हा त्याची वैद्यकीय  तपासणी  झालेली  होती. तसे प्रमाणपत्रही उपलब्ध आहे. त्यात मारहाण किंवा अंगावर जखमांंबाबत उल्लेख नव्हता.

रामराजे चांदणे, कारागृह अधीक्षक, बीड

Comments


bottom of page