top of page

अंजनगावात तणाव कायम; लक्ष्मण हाकेंची मोजणी अधिकार्‍याला धक्काबुक्की

जमावबंदी आदेश लागू; मनोज जरांगे पाटीलांची उद्या अंजगावला भेट, आजी-माजी आमदारांसह पोेलीस अधीक्षकांचे प्रयत्न निष्फळ


सोलापूर: जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. पुतळा बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान यावरून मराठा आणि धनगर समाज आमने सामने आले आहेत.


त्यामुळे अंजनगावात आज तिसर्‍या दिवशी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी नेते हाके यांच्यासह सहकार्‍यांनी पोलिसांचे बॅरिगेट तोडून मोजणी अधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. तिढा सोडविण्यासाठी आजी- माजी आमदारांसह पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून सायंकाळी मंदिराच्या दिशेने दगडफेकीचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले आहे.


छत्रपती शिवजी महाराज यांचा पुतळा आताच्या देवस्थान शेजारील जागेतून हलवून 50 फूट अंतर पलीकडे स्थलांतरित करण्याला धनगर समाजाने सहमती दर्शवली आहे. ती जागा ग्रामपंचायत अधिकारात आहे. हा प्रस्ताव घेऊन पोलिस अधिकारी मराठा समाजाला घेऊन चर्चा करत आहे. त्यांनी मान्यता दिली तर पुतळा हलवला जाईल असे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, आंदोलनास बसलेले फरांडे बाबा यांच्यासह मराठा समाजातील ज्येष्ठांशी चर्चेद्वारे शिवरायांचा पुतळा जर देवस्थानच्या जागेत असेल तर तो स्थलांतर करून इतर ठिकाणी बसवण्यात येईल, आणि पुतळा ग्रामपंचायत, शासनाच्या जागेत असेल तर तो आहे त्या ठिकाणीच राहील असे ठरले होते. त्यास दोन्ही समाजाकडून मान्यता देण्यात आली होती. मात्र, काल लक्ष्मण हाके यांनी अंजनगावात एंन्ट्री करत चर्चेतील तोडगा फेटाळून लावत पुतळा देवस्थानच्या पालखी मार्गात आहे, तो आधी स्थलांतरीत करा अशी मागणी करत घटनास्थळावर ठिय्या मांडला.

पुतळा बसवलेली जागा देवस्थानची आहे की सरकारची यावर हा निर्णय अवलंबून होता. त्यामुळे जमिनीची मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांच्या अंगावर धावून जात लक्ष्मण हाके व त्यांच्या समर्थकांनी अधिकार्‍यांना धक्काबुक्की करत ही मोजणी प्रक्रियाच बंद पाडली. त्यामुळे अंजनगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून गावात जमाबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


प्रशासनाच्या दिवसभर बैठका : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणावर आज पुन्हा धनगर-मराठा आमने सामने आले. लक्ष्मण हाके यांनी देवस्थानच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी बसवलेला पुतळा सन्मानाने स्थलांतर करावा अशी मागणी केली. जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होत नाही. तोपर्यंत इथून आंदोलन संपणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तर पट्टणकोडोली येथील भाकणूक सांगणरे फरांडे बाबा यांनी थेट सदर जागा देवस्थानच्या वीर पुजारी मंडळाच्या नावे असलेले उतारे दाखवलेले आहेत. त्यामुळे आता प्रशासनापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.


नक्की काय करावे यासाठी प्रशासनाची आज दिवसभर बैठका सुरू होत्या, मात्र तोडगा निघाला नाही.

आजी- माजी आमदारांचे प्रयत्नही निष्फळ : माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दोन्ही समाजातील प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेवून जागा मोजणीद्वारे पुतळ्याचा तोडगा काढला. त्यास दोन्ही समाजाकडून एकमताने संमती दर्शविण्यात आली. मात्र सायंकाळी लक्ष्मण हाके यांनी मोजणी अधिकार्‍यांना धक्काबुक्की करत ही प्रक्रियाचा बंद पाडल्याने प्रशासनासमोरील पेच कायम राहीला तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दोन्ही समाजातील ज्येष्ठांच्या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र माजी आमदार राजन पाटील यांचा प्रयत्नही निष्फळ ठरला.


लक्ष्मण हाके यांनी मोजणी अधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्यानंतर मराठा समाज आणि लक्ष्मण हाके यांच्यात वाद झाला असून दगडफेक आणि घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यामुळे गावात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी जमाबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.


रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरज काय - आमदार गोपिचंद पडळकर:

रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरज काय? असा सवाल करत शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. त्यांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने जातीवाद केला जात आहे, त्याला विरोध असून यामध्ये राजकारण केलं जात आहे, असा आरोप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला.


पुतळ्याच्या आडून दूही निर्माण करणार्‍यांचे षडयंत्र हानून पाडा : शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून काही राजकीय स्वार्थापाइ मराठा -धनगर अशी दूही निर्माण करण्याचे षडयंत्र रचत आहेत. मराठ आणि धनगर समाजाने संय्यमाने घेवून यातून तोडगा काढत षडयंत्र हाणून पाडण्याचे आवाहन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे पाटील उद्या अंजनगावस भेट देणार आहेत.

Comments


bottom of page