अजित पवार धुक्याने गेले, का धोक्याने; इथेच संशयाची सुई जास्त - राज ठाकरे
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 2 min read

मुंबई : अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला? अशी शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी आज शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत रोहित पवारांनी राज ठाकरेंसमोर आपल्या मनात असणार्या शंका बोलून दाखवल्या. तसंच पोलिस ठाण्यात गेल्यानंतर एफआयआर दाखल करण्यास नकार देताना काय घडलं हे देखील सविस्तरपणे सांगितलं. यानंतर राज ठाकरेंनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे.
“ अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार रोहित पवार हे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय, एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल? अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेनंतर जर त्यांच्या घरच्यांच्या मनात काही शंका असेल आणि त्यांनी याचा तपास व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली आणि त्यावर सरकार अजित पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा पोलिसांनी साधा एफआयआर नोंदवून घेऊ नये यासाठी दबाव टाकत असेल तर यात नक्की काय काळंबेरं आहे हे जनतेला कळलंच पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, “ रोहित पवारांनी मला येथे येऊन अनेक गोष्टी सांगितल्या, अजित पवार गेल्यानंतर सांशयाची भूतं फिरत आहेत. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो की, अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही. मला त्यांनी सगळ्या तांत्रिक गोष्टी सांगितल्या. मला सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे तीन ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न होऊनही सरकारकडून एफआयआर घ्याचा नाही असं सांगितलं. इथेच संशयाची सुई जाणवत आहे. सरकारला असं का वाटत आहे? पोलिसांना एफआयआर का घेऊ देत नाहीत? अशी विचारणा राज ठकारेंनी केली आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला अधिकारी एफआयआर टाइप करून घेत होते. तितक्यात डीसीपी आले आणि एफआयआर घेऊ नका सांगितलं. हे कशासाठी आहे? जर काही नसेल, घातपात नसेल, पण घरच्यांना काही शंका असेल आणि चौकशी नीट व्हावी असं वाटत असेल तर सरकारकडून अडथळे का आणले जातात? सुनेत्रा ताईंनीही याचा विचार करावा त्यांचेच ते पती होते. त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा एफआयआर आहे आणि सरकाकारकडून घेऊ नका म्हणून दबाव येत आहे. मला काही राजकारण माहिती नाही, पण राज्यात कुणीही एफआयआर नोंदवू शकता असं सांगितलं जातंय तर संशय का निर्माण होतो.”
सरकारच संशय निर्माण करत आहे. एफआयआर नोंदवायचा असेल आणि चौकशी व्हावी असं वाटत असेल तर त्यात गैर काय? या गोष्टीकडे जास्त गांभीर्यने पाहिलं पाहिजे. सरकारनं या गोष्टींची उत्तर दिली पाहिजेत असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
“ ब्लॅक बॉक्सचं काय झालं ते ही कळलं नाही. माझा प्रश्न एकच एफआयआर का नोंदवला जात नाही. यावर सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्र्यांनीही बोललं पाहिजे. सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून घेतला जात नसेल तर या संशयाची भूत या ठिकाणी नाचवली जात आहेत असं वाटत आहे. संशय सरकारच निर्माण करू पाहत आहे का? जर तीन ठिकाणी एफआयआर नोंदवून घेतला जात नसेल तर शासकीय यंत्रणेवर दबाव आहे.” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.



Comments