अजित पवारांना होम पिचवरच रोखण्यासाठी भाजपने रणनीती आखली!
- Navnath Yewale
- Dec 27, 2025
- 1 min read

पिंपरी-चिंचवड : भाजपाने पुण्याबरोबर आता पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. 128 जागांसाइी पिंपरी- चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. अर्ज भरण्यासाठी धामधूम सुरू असतानाच भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी भाजपा 125 जागा जिंकणार, तर अजित पवारांना 3 जागा मिळतील असा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार) नेते राहुल कलाटे यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दुसरीकडे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राहुल कलाटे यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आमदार शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुकीत भाजपा 100 जागा जिंकेल, असे म्हटले होते. कलाटे यांच्या प्रवेशानंतर आता त्यांनी भाजपाला 125 जागा मिळतील असा दावा केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये राहुल कलाटे यांनी समर्थकांसह प्रवेश केला. त्यामुळे भाजपातील इच्छुकांना संधी न मिळण्याचा अंदाज व्यक्त केले जात आहे. भाजपामधील कार्यकर्ते नाराज होतील का, या प्रश्नांवर शंकर जगताप म्हणाले. “ माझ्या कार्यकर्त्यावर अन्या होत असेल, तर आम्ही त्याच्या पाठीशी राहू. आमच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ, पक्षश्रेष्ठींचा आदेश हा भाजपामध्ये अंतिम मानला जातो. कुणी पक्षात येत असेल, तर त्याचे स्वागतच करू” असंही आमदार शंकर जगताप म्हणाले.



Comments